भाजप नेत्या सना खान यांची हत्या, मृतदेह नदीत फेकणाऱ्या अमित साहूला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:47 AM2023-08-12T06:47:01+5:302023-08-12T06:47:13+5:30
सना खान या भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी होत्या. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्या अमितच्या बिझनेस पार्टनर होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर भाजपच्या पदाधिकारी सना खान यांची मध्यप्रदेशातील त्यांच्या बिझनेस पार्टनरने हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या १० दिवसांपासून सना बेपत्ता होत्या. अमित साहू असे त्या बिझनेस पार्टनरचे नाव असून त्याला नागपूर पोलिसांनी जबलपूर येथून अटक केली आहे. त्याने सना खान हिची हत्येची कबुली दिली आहे.
तपासाअंती आरोपी अमित साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मानकापूर पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर पोलिसांच्या सहकार्याने आरोपीला अटक केली. १० दिवसांपासून तो तेथेच लपून बसला होता. त्याच्या चौकशीतून हत्येचे नेमके कारण समोर येईल. पोलिसांचे पथक त्याला नागपूरकडे घेऊन निघाले आहे. सना १ ऑगस्टला अमितला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ताच होत्या. पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौडला अटक केली. त्याने अमितची गाडी धुतल्याची कबुली दिली. गाडीत रक्त सांडले होते व त्याच्या सांगण्यावरून गाडी स्वच्छ केल्याची माहिती त्याने दिली.
कोण होत्या सना खान ?
सना खान या भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी होत्या. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्या अमितच्या बिझनेस पार्टनर होत्या. अमितच्या ढाब्यातही त्यांनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे.
कोण आहे अमित साहू?
अमित साहू हा जबलपूरमधील कुख्यात वाळू व दारू तस्कर आहे. तो एक ढाबादेखील चालवतो. हत्येनंतर तो ढाबा बंद करून पसार झाला होता. सना खान यांचा तो व्यवसायातील भागीदार होता.
मृतदेहाचा शोध सुरू
अमित साहूने सना खानची हत्या केल्यावर तिचा मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. शुक्रवारी अमित पोलिसांना जेथून मृतदेह फेकला होता त्या जागेवरदेखील घेऊन गेला. मात्र, अद्यापही सना खान यांचा मृतदेह सापडलेला नाही.