संपत्तीसाठी मुक्त विद्यापीठाच्या माजी कुलसचिवांची हत्या; मित्रानेच दगा दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 09:13 AM2022-02-17T09:13:30+5:302022-02-17T09:13:45+5:30
नाशिकला धक्कादायक प्रकरण उघडकीस, व्यावसायिकाला ठोकल्या बेड्या
नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) यांच्यासह त्यांचा पुत्र अमित कापडणीस (३५, दोघे रा. जुनी पंडित कॉलनी) यांची संपत्तीसाठी डिसेंबरमध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघडकीस आली. २८ जानेवारीला हे पिता पुत्र बेेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने दिली होती. पोलिसांनी कापडणीस पिता-पुत्रांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्य संशयित व्यावसायिक आरोपी राहुल गौतम जगताप (३६) यास बुधवारी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी राहुल यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जगताप याने पिता-पुत्रांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेऊन जात पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. उच्चभ्रूंची वस्तीत असलेल्या शरणपूर रोडवरील जुन्या पंडित कॉलनीतील कापडणीस पिता-पुत्र काही वर्षांपासून एकटेच राहत होते. पत्नी व मुलगी नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. एमबीबीएस झालेला अमित कापडणीस वैद्यकीय व्यवसाय करत नव्हता. दोघेही पिता-पुत्र एकाकी जीवन जगत होते.
..असा आहे घटनाक्रम
कापडणीस यांची पत्नी, मुलगी काही महिन्यांपासून या पिता-पुत्रांच्या संपर्कात नव्हत्या. दरम्यान, भाऊ अमितचा फोन लागत नाही
व वडिलांचा फोन दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीकडे असून, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कापडणीस यांची कन्या शीतल यांनी नाशिक गाठले. त्यांनी पुन्हा नानासाहेब कापडणीस यांच्या मोबाईलवर फोन केला असता, संशयित राहुल याने तो उचलला आणि शीतल यांची भेट घेतली. त्याने शीतल यांना ‘बंगल्याचे काम सुरू असल्यामुळे तुमचे वडील, भाऊ हे देवळाली कॅम्प येथील रो-हाऊसमध्ये शिफ्ट झाले आहे’ असे सांगितले. त्याच्या बोलण्याचा विश्वास ठेवत शीतल पुन्हा माघारी मुंबईला निघून गेल्या. यामुळे कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांपर्यंत उशिराने पोहोचली.
२८ जानेवारीला तक्रार
२८ जानेवारीला कापडणीस यांची मुलगी पुन्हा नाशिकला आली. मात्र त्यांची वडील व भावाशी भेट होऊ शकली नाही, म्हणून त्यांना संशय आला व त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून पिता व भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
अन् असा आला जाळ्यात
कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्सची विक्री करून राहुलने जमा झालेली रक्कम काढल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच त्याच्या दुकानाचा मॅनेजर प्रदीप शिरसाठकडेही चौकशी केली. त्याच्या बँक खात्यावर नानासाहेब यांच्या खात्यावरून मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे वर्ग केली गेली होती.
थंड डोक्याने रचला कट
कापडणीस यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राहुलने अमितसोबत मैत्री केली. त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता, बँक, शेअर मार्केट, डिमॅट खात्यातील गुंतवणुकीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्याने थंड डोक्याने हत्येचा कट रचला.