पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवेचा तुरुंगात खून

By नारायण बडगुजर | Published: December 28, 2023 09:10 PM2023-12-28T21:10:29+5:302023-12-28T21:13:41+5:30

येरवडा कारागृहातील घटना; चार सराईतांकडून कात्रीने हल्ला

Murder of Mahesh Chandanshive, an innkeeper in Pimpri-Chinchwad city, in jail | पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवेचा तुरुंगात खून

पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवेचा तुरुंगात खून

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: कारागृहात असलेला पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवे याच्यावर कात्रीने हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारागृहात असलेल्या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. येरवडा कारागृहात सर्कल क्र. दोनमधील बरॅक क्रमांक एकच्या आवारामध्ये गुरुवारी (दि. २८) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून कारागृहात घडलेल्या या खूनप्रकरणाने खळबळ उडाली.

महेश महादेव चंदनशिवे (३१, रा. घरकुल, चिखली), असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अनिकेत समदूर (२३, रा. घरकुल, चिखली), महेश तुकाराम माने (२४), गणेश हनुमंत मोटे (२४, दोघेही रा. सांगवी), आदित्य संभाजी मुरे अशी संशयितांची नावे आहेत. 

दरोड्याची तयारी करणे आणि अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी २०२२ मध्ये महेश चंदनशिवे याच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो गेल्या वर्षभरापासून कारागृहात होता. दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पूर्ववैमनस्यातून चौघा संशयितांनी महेश चंदनशिवे याच्यावर केस कापायच्या कात्रीने व दरवाजाच्या बिजागिरीचा तुकड्याच्या साह्याने मानेवर व पोटाच्या बाजूला मारून हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने चंदनशिवे याला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससून सर्वोपचार रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पिंपरी, चिखली, भोसरीत गुन्हे दाखल

मृत महेश चंदनशिवे याच्यावर पिंपरी, चिखली आणि भोसरी या पोलिस ठाण्यांमध्ये २०१३ ते २०२२ या कालावधीत १२ गुन्हे दाखल करण्यात आले. खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दराेडा घालणे, चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. दरोड्याची तयारी करून अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महेश चंदनशिवे हा ३० नोव्हेंबर २०२२ पासून येरवडा कारागृहात सर्कल क्रमांक दोन, बरॅक क्रमांक एकमध्ये बंदीस होता.

मोक्कातील गुन्हेगारांनी केला खून

सांगवी येथील गणेश मोटे याची गुन्हेगारी टोळी आहे. तो टोळीचा प्रमुख असून महेश माने हा टोळीतील सदस्य आहे.  मोटे आणि माने हे दोघेही सांगवी येथील योगेश जगताप खून प्रकरणातील संशयित आहेत. तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. मोकांतर्गत ते कारागृहात आहेत. तर अनिकेत समदूर (२३, रा. घरकुल, चिखली ) हा पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२२ मध्ये झालेल्या एका खून प्रकरणात तो वर्षभरापासून कारागृहात होता.

Web Title: Murder of Mahesh Chandanshive, an innkeeper in Pimpri-Chinchwad city, in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.