धक्कादायक! लाहोरमध्ये PubG चा खेळताना मुलाकडून आईसह दोन बहिणींची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 06:46 AM2022-01-29T06:46:46+5:302022-01-29T06:56:11+5:30
या घटनेत आरोग्य कर्मचारी महिला नाहिद मुबारक (45), त्यांचा 22 वर्षीय मुलगा तैमूर, तसेच 17 आणि 11 वर्षीय दोन बहिणींचे मृतदेह पोलिसांना घटनास्थळी आढळून आले.
लाहोर - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पब्जी गेमच्या आहारी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाने या गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी चक्क गोळ्या झाडून आईसह घरातील सदस्यांची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मुलाने आई, दोन अल्पवयीन बहिणींवर कुटुंबातील सदस्यांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केल्याची माहिती लाहोर पोलिसांनी दिली. लाहोरच्या काहना परिसरात मागील आठवड्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेत आरोग्य कर्मचारी महिला नाहिद मुबारक (45), त्यांचा 22 वर्षीय मुलगा तैमूर, तसेच 17 आणि 11 वर्षीय दोन बहिणींचे मृतदेह पोलिसांना घटनास्थळी आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी मुलगा हा पब्जी (प्लेयर अननोन्स बैटलग्राउंड) या गेमच्या आहारी गेला असून गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठीच आईसह भाऊ-बहिणींची हत्या केली. सातत्याने दिवसभर गेम खेळत राहण्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. मनोगरुग्णाप्रमाणे त्याचं वागणं होतं.
नाहिद मुबारक यांचा तलाक झाला होता. तर, दिवसभर पब्जी गेम खेळणे आणि अभ्यास लक्ष न देण्यामुळे त्या आपल्या मुलावर रागवत होत्या. ज्यादिवशी घटना घडली, त्यादिवशीही त्यांनी मुलाला पब्जी खेळण्यावरुन रागावले होते. त्यानंतर, मुलाने घरातील कपाटातून आईचे पिस्तुल काढले आणि आईसह बहिण-भावांची गोळ्या झाडून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसऱ्या दिवशी मुलानेच सकाळी गोंधळ सुरू केल्यानंतर, शेजाऱ्यांनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मुलगा आणि गटारात पडलेलं पिस्तुल ताब्यात घेतलं. यावेळी, या सर्वांची हत्या कशी झाली हे मला माहिती नाही, असा आरोपीने पोलिसांना म्हटले.
दरम्यान, नाहिद यांच्याकडे पिस्तुलचा परवाना होता, स्वत:च्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी त्यांनी ही बंदुक खरेदी केली होती. मात्र, त्याच पिस्तुलमुळे त्यांच्यावर जीव गमावण्याची वेळ आली. दरम्यान, अधिक पोलीस तपास सुरू असून लाहोरमधील ऑनलाईन गेमिंगमधून घडलेल्या गुन्ह्याचं हे 4 थं प्रकरण आहे.