खिचडीत मीठ जास्त झाल्याने पत्नीची हत्या; भाईंदरला १२ वर्षांच्या मुलासमोरच घडले कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 11:01 AM2022-04-17T11:01:14+5:302022-04-17T11:02:15+5:30
भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनीच या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाची फिर्याद दिली आहे.
मीरा रोड : साबुदाणा खिचडीत मीठ जास्त झाल्याने १२ वर्षीय मुलाच्या डोळ्यांदेखत वडिलांनी आईची गळा आवळून हत्या केली. आईला सोडा म्हणून मुलाने आकांत केला, मात्र बापाने त्याचेही ऐकले नाही. हत्या केल्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन त्याने पत्नीची हत्या केल्याचे सांगितले.
भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनीच या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाची फिर्याद दिली आहे. माळोदे हे शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात असताना ९.४५ च्या सुमारास एक व्यक्ती आली व त्याने पत्नी निर्मला (४०) हिचा गळा आवळल्याचे सांगितले. निकेश राजाराम घाग (४६, गाेडदेव नाका) असे त्याने नाव सांगितले. पोलिसांनी त्याच्यासह रोहिणी इमारत गाठली असता तेथे गर्दी जमली होती. निर्मला यांना रिक्षातून नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत जाहीर केले.
बँकेत काम करणाऱ्या निकेशचा शुक्रवारी उपवास असल्याने निर्मला यांनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. त्यात मीठ जास्त झाल्याने निकेशचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर त्याने मारहाण करून तिला खाली पाडले आणि हाताने तिचा गळा दाबला.
पत्नीने प्रतिकार केला असता नायलॉनची दोरी आणून त्याने पत्नीचा गळा आवळला. आईला वाचविण्यासाठी मुलाने प्रयत्न केला, पण त्याचा निकेशवर काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर निकेश घरातून निघून गेला. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून निकेश याला अटक केली आहे.
नातवाने फाेन करून कळवले आजीला -
- घाग दाम्पत्याच्या मुलाने शुक्रवारी सकाळी ही घटना आजी शेवंती गुरव यांना फाेन करून सांगितली. शेवंती गुरव यांनी ही माहिती मुलगा प्रभाकर यास दिली. प्रभाकर हे पत्नी व मित्र दिनेशसह घटनास्थळी पाेहाेचले आणि निपचित पडलेल्या बहिणीला रुग्णालयात नेले.
- तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. निर्मला यांचा भाऊ प्रभाकर गुरव यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. त्यांनी १५ दिवसांपासून निकेश व निर्मला यांच्यात घरगुती भांडणे सुरू होती, असे सांगितले.