लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या, ९ तास आरोपी मृतदेहासोबत राहिला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 07:55 PM2022-11-17T19:55:36+5:302022-11-17T19:55:50+5:30
पोलिसांनी गेट तोडले तेव्हा २२ वर्षीय महिला बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषित केले.
नवी दिल्ली - श्रद्धा वालकर हत्या प्रकरण अजून ताजे असतानाच दिल्लीतील सरिता विहार परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आरोपी युवक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करून मृतदेह घरात डांबून फरार झाला. फरार होण्यापूर्वी त्याने सुमारे नऊ तास मृतदेहासोबत घालवले. एवढेच नाही तर दोन दिवस तो महिलेचा मृतदेह पाहण्यासाठी रात्री घरी येत होता. आरोपीने महिलेची हत्या तिच्या एक वर्षाच्या मुलीसमोर केली.
हत्या केल्यानंतर आरोपीनं त्या मुलीला सोबत घेतले. महिलेचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. राहुल वर्माला महिलेशी लग्न करायचे होते. सरिता विहार पोलिसांनी आरोपी तरुणाला पाच दिवसांनंतर अटक केली. दक्षिण-पूर्व जिल्हा पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता विहार पोलिसांना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२५ वाजता कॉल आला. मदनपूर खादर येथील एका घरात एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडली असून घराला बाहेरून कुलूप असल्याची माहिती मिळाली. माहितीनंतर एसीपी जगदेव सिंग यांच्या देखरेखीखाली निरीक्षक ज्ञानेंद्र राणा, एसआय दीपक धांडा, एएसआय लियाकत अली आणि एएसआय रमेश कुमार यांच्या पथकाने घटनास्थळी जात तपास सुरू केला.
पोलीस पथकाला घटनास्थळी घरमालक परम बिधुरी हा भेटला. घराला बाहेरून कुलूप होते. पोलिसांनी गेट तोडले तेव्हा २२ वर्षीय महिला बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषित केले. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. परमने सांगितले की, २० दिवसांपूर्वी राहुल त्याच्या घरात भाड्याने राहायला आला होता. राहुलने त्याला फोन करून त्याची महिला मैत्रिण गुलशना घरात मृतावस्थेत पडल्याचे सांगितले होते. त्यावर पोलिसांनी राहुलचा भाऊ प्रवीण याच्याशी संपर्क साधला. राहुलचे कुटुंबही मदनपूर खादर येथे राहते. प्रवीणने सांगितले की, राहुल एका महिलेसोबत २० दिवसांपासून सहमतीने रिलेशनशिपमध्ये राहत होता. महिलेला एक वर्षाची मुलगीही आहे.
पोस्टमॉर्टममध्ये महिलेची हत्या झाल्याचे उघड
गुलशनाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची कारवाई केली. एसआय दीपक धांडा यांनी एम्समध्ये महिलेचे पोस्टमार्टम केले. त्यानंतर गुलशनाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले आहे. यानंतर एसआय दीपक धांडा, एएसआय लायक अली आणि रमेश कुमार यांच्या पथकाने महिलेच्या हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. एसीपी जगदेव सिंग यांनी वैयक्तिकरित्या तपासावर देखरेख केली. तपासाअंती पोलीस पथकाने १६ नोव्हेंबर रोजी राहुलला सरिता विहार जंगलातून त्याला अटक केली.
मृतदेह पाहण्यासाठी रात्री यायचा
दक्षिण-पूर्व जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राहुलला गुलशनाला संशय होता की तिचे कोणासोबत तरी अफेअर आहे. या मुद्द्यावरून त्यांच्यात रोज भांडण व्हायचे. गुलशनाने त्याच्याकडे पाच हजार रुपये मागितले. या मुद्द्यावरून वाद झाला. या भांडणातून १० नोव्हेंबर रोजी दुपारी गुलशनाचा हाताने आणि ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर आरोपी रात्री दहा वाजेपर्यंत महिलेच्या एक वर्षाच्या मुलीसह मृतदेहाजवळ थांबला. रात्री दहा वाजता तो मुलीसह घरातून पळून गेला. त्यानंतर मुलीला दुसऱ्याकडे सोपवून तो पळाला. यानंतर आरोपी रात्री २ वाजता गुलशनाचा मृतदेह पाहण्यासाठी घरी आला. असाच तो २ दिवस येत राहिला. त्यानंतर त्याने घरमालकाला माहिती दिली.