धुऱ्याच्या वादातून दिग्रस येथे एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 11:04 AM2020-07-05T11:04:55+5:302020-07-05T11:05:02+5:30
पंढरी वायाळ व ऋषीकेश वायाळ यांनी तातेबा जायभाये यांच्यावर कुºहाड व लोकंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले.
देऊळगाव मही: देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड वायाळ शिवारात शेतीच्या वादातून दिग्रस बुद्रूक येथील एकाचा धारधार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना तीन जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
तातेबा लहानू जायभाये असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रारंभी देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे प्रथमोपचार करून त्यांना जालना येथे हलविण्यात आले. मात्र जालना येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी चार जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. दिग्रस बुद्रूक येथील तातेबा जायभाये आणि आरोपी पंढरी वायाळ यांची शेती जवळ जवळ आहे. मध्यंतरी आरोपीने मृत व्यक्तीच्या कुटूंबियांना शेतीच्या धुºयाच्या वादातून शिवीगाळ केली होती. त्यानंतर हा वाद मिटविण्यात आला होता. दरम्यान, तीन जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास तातेबा जायभाये हे शेतातील त्यांच्या घरासमोर झोपलेले असताना पंढरी वायाळ व ऋषीकेश वायाळ यांनी तातेबा जायभाये यांच्यावर कुºहाड व लोकंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले. तातेबा जायभाये यांचा आरडा ओरडा ऐकू आला असता त्यांचा मुलगा, तातेबांची पत्नी व अन्य कुटुंबिया बाहेर आले असता हा संपूर्ण प्रकार त्यांना दिसला, असे पोलिस तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, गंभीर अवस्थेत तातेबा जायभाये यांना त्वरित देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालय व तेथून जालना येथे हलविण्यात आले असता जालना येथे त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृत व्यक्तीचे नातेवाईक मनोहर तातेबा जायभाये यांनी अंढेरा पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी चार जुलै रोजी टाकरखेड वायाळ येथील पंढरी रामभाऊ वायाळ आणि ऋषीकेश वायाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.