फसवणूकीच्या रागातून घाटकोपरमधील एकाची हत्या; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 09:19 PM2019-08-06T21:19:27+5:302019-08-06T21:26:40+5:30
याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे.
मुंबई - घाटकोपर येथील व्यक्तीने मांडुळ साप तस्करीमध्ये लाखोंची फसवणुक केल्याचा राग मनात ठेवून त्या व्यक्तीची कराडच्या कोयनानगर येथे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी घाटकोपरपोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. मृत इसमाचे नाव उदयभान रामप्रसाद पाल (47) असे असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे प्रदीप शंकर सुर्वे (47), विनोद पोपट शुद्रीक (30), सुरेश बाळू सोनावणे (33) आणि अक्षय दीपक अवघडे (23) अशी आहेत.
उदयभान पाल हे घाटकोपरच्या अशोक नगर परिसरात राहात होते. ते 17 जून पासून कामानिमित्त कराडला गेले होते. मात्र बरेच दिवस झाले तरी पाल घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नी सावित्री पाल यांनी घाटकोपर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी पाल यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढून तपास केला असता पाल हे मांडुळ साप तस्करीमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले. याआधारे पोलिसांनी पुढे केलेल्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप शंकर सुर्वे याची पाल यांनी मांडुळ साप विक्री प्रकरणात 21 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केली होती. त्यामुळे सुर्वेचा पाल यांच्यावर राग होता. त्यातूनच पाल कराड येथे आले असता पाल यांना कोयनानगर, गोपाळवाडी येथील ओढ्यामध्ये नेऊन प्रदीप सह इतर आरोपींनी मिळून लाकडी दांड्याने मारहाण करत त्यांचा खून केला. त्यानंतर कलीम शब्बीर अहमद कुरेशी याने पाल यांचा मृतदेह कुंभार्ली घाटामध्ये नेऊन खोल दरीत फेकून दिला. दरम्यान या हत्येतील आरोपी प्रदीप सुर्वे यासह इतरांना कराड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.