अमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून एकाची हत्या; हत्येनंतर केलेल्या बनावामुळेच लागले पोलीसांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 09:10 PM2021-06-25T21:10:50+5:302021-06-25T21:16:44+5:30
Murder case : अवघ्या बारा तासात पोलिसानी गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : अमली पदार्थ विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याच्या वादातून एकाची हत्या झाली आहे. हत्या झालेली व्यक्ती सराईत गुन्हेगार असून त्याच्या तीन साथीदारांची त्याची हत्या केली. मात्र हत्येनंतर त्यांनी पुन्हा घरी येऊन केलेल्या बनावातूनच पोलीसांना सुगावा मिळाला. त्यामुळे अवघ्या बारा तासात पोलिसानी गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे.
गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास जुहूगाव येथे हि घटना घडली. त्यात हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव जेकब क्रिस्तोपा वै (३३) असे आहे. तो जुहूगाव येथील काळूबाई निवास इमारतीमधील घरात राहायला होता. त्याच्यावर १५ हुन अधिक वेगवेगळे गुन्हे दाखल असून तुकताच तो अमली पदार्थ विक्रीत सक्रिय झाला होता. अमली पदार्थ पुरवणाऱ्यांकडून वेगवेगळे अमली पदार्थ तो मागवायचा. त्यानंतर विजय राठोड, तोहीद खान व सूरज मांढरे यांच्या मदतीने त्याची नवी मुंबई परिसरात विक्री करायचा. यातून मिळणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा तिघांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम तो स्वतःला ठेवायचा. परंतु आपल्या पेक्षा जेकब यालाच अधिक नफा होत असल्याची गोष्ट तिघांनाही खटकत होती. यावरून त्यांचा वाद सुरु होता. अखेर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास तिघेही जेकब याच्या घरी अमली पदार्थ विक्रीतून आलेली रक्कम घेऊन आले होते. त्याठिकाणी जेकब हा पैसे मोजत असतानाच तिघांनी त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. त्यात जेकब याच्या डोक्याचे दोन भाग होऊन तो जागीच मृत पावला. यानंतर तिघांनीही घराला बाहेरून कुलूप लावून त्याठिकाणावरून पळ काढला. तर रात्रीच्या सुमारास पुन्हा त्याठिकाणी येऊन खिडकीतून डोकावून जेकब हा मृतअवस्थेत पडल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते.
याप्रकरणी मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्ह्याच्या अनुशंघाने वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण यांनी निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक दीपक शिखरे, सचिन ढगे, उपनिरीक्षक योगेश परदेशी, हवालदार शैलेश कदम, रवींद्र पाटील, सुनील चिकणे आदींचे पथक तयार केले होते. त्यांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता संध्याकाळच्या सुमारास संशयित तिघेजण त्या परिसरात येऊन गेल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी त्या तिघांची माहिती मिळवली असता जेकब याला मृत अवस्थेत पहिल्यांदा पहिल्याच बनाव करणारेच मारेकरू असल्याचे समोर आले. यानुसार अवघ्या बारा तासाच्या आत त्यांना अटक करण्यात आली आहे.