संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 11:39 AM2021-06-07T11:39:54+5:302021-06-07T11:40:03+5:30
Crime News : रंगनाथ खेडकर या व्यक्तीचा तीन जणांनी अनैतिक संबंधातून खून केला असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा: सिंदखेड राजा तालुक्यातील रुम्हणा येथून बेपत्ता झालेल्या व ३ जून रोजी पेनटाकाळी प्रकल्पामध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळलेल्या रंगनाथ खेडकर या व्यक्तीचा तीन जणांनी अनैतिक संबंधातून खून केला असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाेन संशयीतांना ताब्यात घेतले असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे.
त्यामुळे या प्रकरणातील संशयीत आरोपींची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आव्हानात्मक प्रकरणात लक्ष घातले होते. त्यानुषंगाने पोलिस अधीक्षक हे ६ जून रोजी किनगाव राजा, साखरखेर्डा परिसरात होते. ३१ मे दरम्यान रंगनाथ खेडकर यांना एका फोनद्वारे पांंग्री उगले फाटयावर बोलविण्यात आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. प्रकरणी किनगाव राजा पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान पेनटाकळी धरणात रंगनाथ खेडकर यांचा संशयास्पद स्थितीत ३ जून रोजी मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी अमडापूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. अमडापूर, किनगाव राजा आणि साखरखेर्डा पोलिसांनी आपसी समन्वयातून या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यात त्यांना जाफ्राबाद येथून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली त्याच्या आधारावर पोलिसांनी जागदरी येथून दोघांना अटक केली. तिसऱ्या आरोपीचाही पोलिस शोध घेत आहेत. रंगनाथ खेडकर याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानुषंगाने तिसऱ्या आरोपीचा पोलिस सध्या शोध घेत आहेत.