प्रेयसीला भेटायला ६३ वर्षीय व्यक्ती मध्यरात्री बागेत गेला, ती भेटली पण भलतंच घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:34 PM2022-05-31T19:34:54+5:302022-05-31T19:35:16+5:30
प्रथम दर्शनी फॉरेन्सिक युनिटचे उच्च अधिकारी या प्रकरणाला हृदयविकाराचा झटका आल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं मानत होते.
रीवा-
मध्य प्रदेशच्या रीवा येथील एका निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याची प्रेम प्रकरणाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणात पोलिसांनी एका दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यू झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्याचं आरोपी महिलेसोबत प्रेम संबंध होते. संबंधित महिला मध्यरात्री एका बागेत त्याला भेटायला गेली होती. जिथं महिलेच्या पतीनं दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं आणि त्याचा संताप झाला. पतीनं त्याच्या जवळील गमछ्यानं पत्नीच्या प्रियकराचा गळा आवळून हत्या केली.
प्रथम दर्शनी फॉरेन्सिक युनिटचे उच्च अधिकारी या प्रकरणाला हृदयविकाराचा झटका आल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं मानत होते. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर वृद्धाचा खून झाल्याचं निष्पन्न झालं. मृताच्या नातेवाईकांना सुरुवातीपासूनच हत्येचा अंदाज होता. सायबर सेलच्या मदतीने पोलीस महिलेपर्यंत पोहोचले, घटनेच्या रात्री सेवानिवृत्त कर्मचाऱ्याशी ती फोनवर बोलली होती. पोलिसांनी आरोपी महिलेच्या पतीकडे चौकशी केली असता त्यानं टोलवा टोलवी सुरू केली आणि पोलिसांना संशय आला. खाकी इंगा दाखवल्यानंतर आरोपी पतीनं सारं उलगडून सांगितलं.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, ६३ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी राजकुमार मिश्रासोबत त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. घटनेच्या मध्यरात्री तो घरी परतले असता पत्नी घरात नसल्याचं त्याला दिसलं. मुलांना विचारल्यावरही काही कळू शकलं नाही. पत्नीला शोधत असताना बागेच्या दिशेने गेले असता राजकुमार मिश्रासोबत त्याची पत्नी आढळून आली. दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहून पती संतापला. पत्नीच्या मदतीनं त्यानं राजकुमार मिश्रा यांचा गमछ्यानं गळा आवळून खून केला. त्यानंतर दोघांनी मिळून राजकुमार यांचा मृतदेह काही अंतरावर आणून फेकून दिला. त्यांनी मृताची सोनसाखळी व रोख रक्कम घेऊन पळ काढला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.