सलग दुसऱ्या दिवशी हत्या; डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 02:36 PM2021-09-13T14:36:45+5:302021-09-13T14:37:41+5:30
Murder Case : या घटनेत पुतण्यावरच संशय व्यक्त केला जात असला तरी त्याबाबत ठोस पुरावा किंवा माहिती मिळू शकलेली नाही.
जळगाव : निमखेडी शिवारात मुलांनी बापाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवारी जुन्या जळगावातील आंबेडकर नगरातही खुनाची घटना उघड झाली. राजू पंडीत सोनवणे (वय ५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून डोक्यात कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने घाव घालण्यात आलेले आहेत. दरम्यान, या घटनेत पुतण्यावरच संशय व्यक्त केला जात असला तरी त्याबाबत ठोस पुरावा किंवा माहिती मिळू शकलेली नाही.
जुन्या जळगावात राजू पंडीत सोनवणे हे वरच्या मजल्यावर एकटे वास्तव्य करीत होते, तर खाली आई द्रौपतीबाई या वास्तव्याला आहेत. सोमवारी सकाळी १०.१५ वाजता नळांना पाणी आले होते. पाणी भरण्यासाठी राजू खाली नळावर का आले नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या आशा सोनवणे या त्यांना आवाज देण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या असता राजू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी हा प्रकार त्यांची आई व इतर नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शनी पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे,उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक फौजदार रवींद्र पाटील, अमोल पाटील, गिरीश पाटील आदींचा ताफा दाखल झाला. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरुन काही नमुने संकलित केले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
दोन घटनांनी शहर हादरले
सतत आईच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, मुळ रा.घनश्यामपूर, ता.खकनार, जि.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा मुलाने छातीत चॉपर खोपसून खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ घडली होती. यात गोपाल व दीपक या दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर सोमवारी पुन्हा आंबेडकर नगरात खुनाचा घटना घडली. यात देखील पुतण्यावरच संशय व्यक्त केला जात आहे. सलगच्या दोन घटनांनी शहर हादरले आहे.