टेलर मार्कच्या आधारे अवघ्या १२ तासांत खुनातील गुन्ह्याची उकल; कळवा पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:06 PM2021-12-02T23:06:57+5:302021-12-02T23:10:24+5:30
Crime News : कळवा येथील खाडीपुलाखालील वाहत्या पाण्यामध्ये १ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वाहून आल्याचे कळवा पोलिसांना आढळले होते.
ठाणे : खून करुन मंगळवारी खाडीत टाकलेल्या असिफ शेख (३२, रा. गोवंडी) या जरी कामगाराच्या मृतदेहाच्या केवळ शर्टावरील टेलर मार्कच्या आधारे ठाण्याच्या कळवा पोलिसांनी निजामुद्दीन शेख (४४, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) याच्यासह पाच जणांना अटक केली. उसनवारीवरुन घेतलेल्या दहा हजारांवरुन हा वाद झाल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी दिली.
कळवा येथील खाडीपुलाखालील वाहत्या पाण्यामध्ये १ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वाहून आल्याचे कळवा पोलिसांना आढळले होते. त्याचे हात पाय बांधलेले आणि अंगावर ठिकाठिकाणी मारहाणीच्या जखमा असल्याचेही आढळल्याने हत्याराने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खाडीमध्ये हा मृतदेह टाकल्याचे उघड झाले. त्यामुळे कळवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.
याच मृतदेहाच्या शर्टावर मिळालेल्या ‘सुंदर टेलर्स’ या मार्कच्या आधारे टेलरचे नाव आणि मोबाईल क्रमांकही पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांना मिळाला. त्यानंतर पोलीस उपायुक्त अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र कुंवर, प्रकाश दिनकर, उपनिरीक्षक महेश कवळे, एम. एच. मकानदार, जमादार एम. पी. महाजन आणि पोलीस हवालदार शिंदे आदींच्या पथकाने गोवंडीतील सुंदर टेलर्सच्या मालकाचा शोध घेतला. तेंव्हा हा शर्ट आणि मृतदेह आसिफ शेख (रा. शिवाजीनगर, गोवंडी) याचा असल्याचे निष्पन्न झाले.
आसिफच्याच मोबाईलच्या आधाराने गोवंडीतील निजामुद्दीन शेख तसेच मिङर नवाब (३०), मोहंमद इरफान खान, आवेश शेख (१९) आणि अरबाज वाडेकर (१९) अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आसिफकडून निजामुद्दीनच्या बहिणीने दहा हजारांची रक्कम घेतली होती. तिने ती रक्कम त्याला परतही केली होती. मात्र, तरीही तो तिला त्रस देत होता. तसेच तिला ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली होती.
त्यामुळेच चिडलेल्या निजामुद्दीनने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. आसिफला पैसे देण्याच्या बहाण्याने निजामुद्दीनने गोवंडीतील त्याच्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर वरील या मित्रांच्या मदतीने त्याला लाकडी बांबू तसेच हत्याराने प्रहार करुन त्याचा ३० नोव्हेंबर रोजी खून केला. पुरावा मिळू नये म्हणून त्याचा मृतदेह हात आणि पाय बांधून गोणीत भरन ऐरोली येथील खाडीच्या पाण्यात टाकून दिल्याची कबूली या आरोपींनी दिल्याचे अंबुरे यांनी सांगितले.