अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शिक्षकाचा खून; सरवड फाट्यावर अपघाताचा बनाव उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 06:30 PM2021-07-02T18:30:40+5:302021-07-02T18:32:04+5:30
Murder Case : २६ जून रोजी सरवड ते लामकानी रोडवर सप्तशृंगी मंदिरासमोर रात्री ९ वाजेच्या सुमारास संदीपकुमार बोरसे या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता.
धुळे : तालुक्यातील सरवड फाट्यावर कारच्या धडकेत ठार झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक संदीपकुमार विश्वासराव बोरसे (३४, रा. सरवड, ता. धुळे) याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सोनगीर पोलीस करीत असताना धक्कादायक बाब उजेडात आली. हा अपघात नसून खून असल्याचे समोर आल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली. अनैतिक संबंधात संदीप हा अडचण ठरत असल्याने मित्रांनी त्याचा खून केल्याचे समोर आले.
२६ जून रोजी सरवड ते लामकानी रोडवर सप्तशृंगी मंदिरासमोर रात्री ९ वाजेच्या सुमारास संदीपकुमार बोरसे या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता. वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची प्राथमिक माहिती सोनगीर पोलिसांत नोंदविण्यात आली होती. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असताना मिळालेले धागेदोरे आणि मृताच्या नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून अपघात नसून हा घातपात असल्याचा संशय निर्माण झाला. सोनगीर पोलिसांनी शरद दयाराम राठोड (३६, रा. पाडळदे, ता. धुळे, हल्ली मुक्काम जय मल्हार कॉलनी, साक्री रोड, धुळे) आणि राकेश ऊर्फ दादा मधुकर कुवर (कोळी) (३१, रा. सरवड, ता. धुळे) या दोघांना अटक केली.
शरद राठोड याचे शिक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती झाल्यापासून संदीपकुमार दारूच्य नशेत कायम शरदला शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला.
२६ जून रोजी रात्री शरद राठोड याने दादा कोळी याच्याशी संगनमत करून देवभाने फाट्यावर पार्टीच्या बहाण्याने संदीपकुमार याला कारने नेले. तेथे दारू पाजून संदीपकुमार यांना तर्र केले. तसेच रात्रीच त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने सरवड गावाजवळ रोडवरच सोडून दिले. त्यानंतर बोरसे हे घरी पायी जात असताना संदीपकुमार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरात धडक देऊन उडविले. अपघाताचा बनाव करीत संदीपकुमार यांचा एक प्रकारे खून करण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी मिळालेला कारचा लोगो, बंफरचे तुकडे, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज अशा काही पुराव्याच्या साहाय्याने गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. शरद राठोड आणि राकेश कुवर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व त्यांच्या पथकाने केली.