टपली मारल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 07:22 AM2021-10-27T07:22:17+5:302021-10-27T07:28:52+5:30

Crime News : वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर परिसरातील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात मंगळवारी दहावीची चाचणी परीक्षा होती. वर्ग भरल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता किरकोळ कारणावरून तुषारसह त्याच्या काही मित्रांनी आधीचा वाद उकरून काढला.

The murder of a tenth grader out of anger at being slapped | टपली मारल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

टपली मारल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

googlenewsNext

ठाणे : राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील दहावीतील विद्यार्थ्याची केवळ टपली मारल्याच्या रागातून त्याच शाळेतील चौघा विद्यार्थ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. तुषार साबळे (१५, रा. ज्ञानेश्वरनगर, वागळे इस्टेट, ठाणे) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरू असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.

वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर परिसरातील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात मंगळवारी दहावीची चाचणी परीक्षा होती. वर्ग भरल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता किरकोळ कारणावरून तुषारसह त्याच्या काही मित्रांनी आधीचा वाद उकरून काढला. सोमवारी दुपारी चार ते पाच जणांच्या दोन गटांमध्ये टपली मारण्यावरून वाद झाला होता. हाच वाद मंगळवारी पुन्हा उफाळून आला.

तेव्हा दहावी ब तुकडीतील तुषार मध्यस्थीसाठी गेला असता त्यानेच टपली मारल्याचा समज झाल्याने त्याच्या छातीवर दहावी अ तुकडीतील एकाने चाकूने वार केले. त्याच्या अन्य तीन साथीदारांनीही मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या तुषारला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

एका साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरू
शालेय विद्यार्थ्यांमधील या हाणामारीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, निरीक्षक विजय मुतडक आणि उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने मुख्य सूत्रधारासह तीन १५ वर्षीय मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. 
त्यांच्या अन्यही एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The murder of a tenth grader out of anger at being slapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.