क्षुल्लक कारणावरुन शिकाऊ डॉक्टरची हत्या; ४८ तासांत आरोपीला केलं गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 08:56 PM2021-11-13T20:56:11+5:302021-11-13T20:56:40+5:30

एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक सुरेंद्र पाल (२४) रा. मेडिकल कॅम्पस याची मुलींच्या वसतिगृहाजवळच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली

Murder of a trainee doctor for trivial reasons; The accused was released in 48 hours | क्षुल्लक कारणावरुन शिकाऊ डॉक्टरची हत्या; ४८ तासांत आरोपीला केलं गजाआड

क्षुल्लक कारणावरुन शिकाऊ डॉक्टरची हत्या; ४८ तासांत आरोपीला केलं गजाआड

Next

यवतमाळ : संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण करणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थ्याच्या हत्येतील आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी दिलेला कबुलीजबाब त्याहीपेक्षा धक्कादायक आहे. डॉक्टरला दुचाकीचा कट लागल्यावरून वाद झाला. या वादात त्याच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी शनिवारी सायंकाळी झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.

एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक सुरेंद्र पाल (२४) रा. मेडिकल कॅम्पस याची मुलींच्या वसतिगृहाजवळच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात सुरुवातीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुषार शंकर नागदेवते (२४), आकाश दिलीप गोफणे (२१) दोघे रा. वाघापूर यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांच्या गुन्ह्यातील सहभागाबद्दल पोलिसांना ठोस पुरावे हाती लागले नव्हते. त्यामुळे या घटनेचा तपास सुरूच होता. त्यासाठी सहा पथके गठित करण्यात आली.

यात यवतमाळ शहर, अवधूतवाडी, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेलचा समावेश होता. जवळपास शंभर खबऱ्यांच्या माध्यमातून घटनेच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यात आली. सीडीआर, एसडीआर, डमडाटा याची पडताळणी केल्यानंतर मुख्य आरोपीचा शोध लागला. ऋषिकेश गुलाबराव सवळे (२३) रा. महावीरनगर, प्रवीण संजीव गुंडजवार (२४) रा. सावित्रीबाई फुले सोसायटी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, चाकू जप्त केला.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक डाॅ.के.ए. धरणे, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, नंदकिशोर पंत, सहायक निरीक्षक अमोल पुरी, गणेश वनारे, विवेक देशमुख, जनार्दन खंडेराव, योगेश रंधे, जमादार बंडू डांगे, नीलेश राठोड, बबलू चव्हाण, सलमान शेख, किशोर झेंडेकर, सुमित पाळेकर, अजय निंबोळकर, रोशनी जोगळेकर, गजानन क्षीरसागर, अमित कदम, मिलिंद दरेकर, नीलेश भुसे, अल्ताफ शेख यांनी केली.

तपास पथकाला एक लाखांचे बक्षीस

 

४८ तासात संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींना शस्त्रासह अटक केली. ही कारवाई करणाऱ्या पोलीस पथकांना एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी रोख एक लाख रुपयांचे बक्षीस, जीएसटी व सीनोट, गुड रिमार्क जाहीर केला.

अशी घडली घटना

तीनही आरोपी दुचाकीवरून दारूची खेप टाकून महाविद्यालय परिसरातून जात होते. त्यावेळी मुलींच्या वसतिगृहाजवळ दुचाकीचा अशोक पाल याला कट लागला. यावरून शाब्दिक वाद झाला. या वादातच आरोपीने अशोकच्या छातीत व पोटाच्या खाली वार केले. दोन्ही वार वर्मी लागल्याने अशोकचा जागीच मृत्यू झाला, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

त्रिपुरातील घटनेनंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन एसपी डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे.

Web Title: Murder of a trainee doctor for trivial reasons; The accused was released in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.