पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले ३०० तुकडे, सेवानिवृत्त लष्कर डॉक्टरला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 10:09 PM2020-02-26T22:09:01+5:302020-02-26T22:11:11+5:30
नातेवाईकांना देखील संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या हत्या प्रकरणाची माहिती दिली.
भुवनेश्वर - ३ जून २०१३ साली लष्कराच्या एका निवृत्त डॉक्टरनं आपल्या पत्नीची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर पतीनं मृतदेहाचे ३०० तुकडे केले होते. या हत्येप्रकरणी कोर्टाने निर्णय देत ७८ वर्षीय सेवानिवृत्त लष्कराच्या डॉक्टराला पत्नीची हत्या करून मृतदेहाचे ३०० तुकडे केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निवृत्त ले. कर्नल सोमनाथ परिदा असं या दोषी पतीचं नाव आहे. ३०० तुकडे करून २२ वेगवेगळ्या स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवलं होतं. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चॉपर, एक चाकू आणि दोन कटर सुद्धा जप्त केले होते.
खोर्धा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लोकनाथ महापात्रा यांनी सोमनाथ परीदा यांना हत्येप्रकरणी दोषी ठरविल्यानंतर शिक्षा सुनावली. आरोपीवरील आरोप परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे होते. कारण या हत्येप्रकरणात कुणीही प्रत्यक्षदर्शी नव्हता. त्याने ३ जून २०१३ रोजी आपल्या ६२ वर्षाची पत्नी उषाश्री परिदा यांची हत्या केली होती. २१ जूनला नयापल्ली पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली होती.
जवळपास पंधरा दिवसांनी ही हत्येची घटना समोर आली. ज्यावेळी मृत महिलेच्या मुलीला तिच्या आईशी फोनवर बोलणं होत नसल्याने संशय आल्याने ही घटना उघडकीस आली. पीडितेची मुलगी परदेशात राहत होती. तिनं आपल्या आईशी बोलण्याचा खूप आग्रह वडिलांना केला. मात्र, तिच्या वडिलांनी तिला आईसोबत बोलू दिलं नाही. मुलीने नंतर नातेवाईकांना चौकशीसाठी घरी पाठवलं. नातेवाईकांना देखील संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या हत्या प्रकरणाची माहिती दिली.