चारित्र्याच्या संशयावरून सपासप वार करून पत्नीची हत्या; सोशल मीडियावरून झालेल्या प्रेम विवाहाचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 06:25 PM2021-06-30T18:25:46+5:302021-06-30T18:26:39+5:30
Murder Case : मासळ ( बु ) येथील बेघर वस्तीतील घटना
मासळ(बु) (चंद्रपूर) : दीड वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यायातील एका विधवा महिलेचे चिमूर तालुक्यातील मासळ ( बु ) येथील व्यक्तीशी सोशल मीडियावरून सुत जुळले. घरच्या मंडळीना विरोध करून तिने मासळ येथील तंटामुक्त समितीच्या माध्यमातून त्या व्यक्तीबरोबर प्रेमविवाह केला. यातून तिला एक मुलगी झाली. मात्र पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. संशयावरून मंगळवारी रात्री १२ वाजता पती- पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. पतीने घरातील बाजुला पडून असलेली काठी उचलून पत्नीवर सपासप वार करून हत्या केली.
मृतक पत्नीचे नाव विशाखा दीक्षीत पाटील (२९) रा. मासळ असे आहे. पोलिसांनी आरोपी पती दीक्षीत हरीदास पाटील (३९) रा. मासळ ( बु ) याला अटक केली आहे. आरोपी दिक्षीत पाटील याची मृतक विशाखा ही तिसरी पत्नी आहे. यापूर्वी आरोपीने विहीरगाव येथील व नागपूर येथील मुलींशी प्रेमविवाह करूनच लग्न केले होते. मात्र आरोपी संशयी वृत्तीचा असल्याने या दोन्ही पत्नी जास्त काळ टिकल्या नाही. यापैकी एकीची सोडचिठ्ठी झाल्याचे समजते. दीड वर्षापासून विशाखाचा संसार फुलत असताना अधूनमधून पती-पत्नीचे खटके उडायचे. दरम्यान पतीच्या जाचाला व संशयी वृत्तीला कंटाळून विशाखा एक महिन्याच्या मुलीला सोडून गोंदिया येथे माहेरी गेली होती. ती सात महिने सासरी आलीच नव्हती. या संदर्भात पत्नीने पती विरोधात पोलिसात तक्रार दिली असता आरोपीने पत्नी विशाखा मिसींग झाल्याची पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पुन्हा विशाखा व दीक्षीत यांच्यात मोबाइल फोन वरून प्रेम कहानी सुरु झाली. तब्बल सात महिन्यांनी पुन्हा आई वडीलांना न विचारता विशाखा परस्पर मासळ येथे सासरी आली होती. आल्याला नुकतेच आठ दिवस झाले होते. पुन्हा मंगळवारच्या मध्यरात्री दोघांत संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. भांडण एवढे विकोपाला गेले की आरोपी पती दिक्षीत पाटील याने पत्नी विशाखावर काठीने सपासप वार करत तिची हत्या केली. फिर्यादी प्रिया पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी दीक्षीत पाटील याला अटक केली. त्याला चिमूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यत पीसीआर दिला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड करीत आहेत.