संपत्तीच्या वादातून महिलेची घरात घुसून हत्या; ११ जण पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:52 PM2020-08-10T12:52:03+5:302020-08-11T20:08:40+5:30
महिला व तिच्या पतीवर हल्ला केल्यानंतर संबंधितांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली.
जालना : संपत्तीच्या वादातून एका महिलेचा खून केल्याप्रकरणी ११ जणांविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जालना शहरातील काझीपुरा भागात घडली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत या प्रकरणातील ११ आरोपींना जेरबंद केले.
हिना सय्यद माजीद (३०) असे मयत महिलेचे नाव आहे. हिना सय्यद माजीद व त्यांचे पती सय्यद माजीद सय्यद कय्यूम हे रविवारी रात्री घरी होते. त्यावेळी अचानक घरी आलेल्या अरबाज खान जाफर खान, निलोफर जाफर खान, नसीमाबी जाफर, हलिमाबी धूमअली शहा, नसीमाबी शेख वहाब, शहाबाज जाफर खान, शेख अजगर शेख अब्दुल वहाब, शबाना धुमअली शहा, अकबर धुमअली शहा, नफीसा अलताफ खान, इस्माईल उर्फ शक्ती अहेमद शहा यांनी घरात घुसून हिना सय्यद यांना लोखंडी रॉड, काठीने मारहाण केली. तसेच चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हिना सय्यद यांचा मृत्यू झाला. शिवाय सय्यद माजीद सय्यद कय्यूम यांनाही लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील ११ जणांविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि संजय देशमुख, सपोनि रूपेकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच सर्व ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीचा डीव्हीआर नेला काढून
महिला व तिच्या पतीवर हल्ला केल्यानंतर संबंधितांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी संबंधित डीव्हीआरचाही शोध सुरू केला आहे. तपास सपोनि नागवे हे करीत आहेत.