भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करणे जीवावर बेतले,सहा जणांनी मिळून 'त्या'ला ठार मारले; चिंचवड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 03:41 PM2020-08-24T15:41:40+5:302020-08-24T15:42:06+5:30
पिंपरी पोलिसांनी केली दोघांना अटक
पिंपरी : पूर्ववैमनस्यातून आठजण एकाला मारण्यासाठी आले असता भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास तरुण आला. त्यावेळी सहा जणांनी त्या तरुणाला ठार मारले. विद्यानगर, चिंचवड येथे शनिवारी (दि. २२) ही घटना घडली. यातील दोघांना पिंपरी पोलिसांनीअटक केली आहे.
विनोद ऊर्फ पप्प्या राकेश पवार (वय २१), अजय ऊर्फ एबी गणेश भिसे (वय २०, दोघेरा. दत्तनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शंकर गोविंद सुतार (वय २३, रा. विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नीला गोविंद सुतार (वय ४५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
नीला सुतार यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शंकर सुतार व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग आरोपी यांच्या मनात होता. शंकर सुतार हाहनुमान मंदिरासमोर झोपला होता. रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी तेथे आले. झोपेत असलेल्या शंकर याच्यावर धारदार शस्त्राने वार करून दगडी पाटा डोक्यात मारला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपी विनोद हा एकासोबत बौद्धनगर, पिंपरी येथे कुणालातरी भेटण्यासाठी आला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विनोद आणि अजय यांना ताब्यात घेतले. सहा साथीदारांसह शंकर सुतार याचा खून केल्याचे त्यांनी सांगितले.
शंकर सुतार याच्या मित्रासोबत आरोपींची भांडणे होती. शंकर याच्या मित्राने आरोपींना खुन्नस दिल्याचाही राग आरोपींच्या मनात होता. शंकर याच्या मित्राला मारण्यासाठी आरोपी आले होते. त्याला मारत असताना शंकरने मध्यस्थी केली. त्यामुळे आरोपी यांनी शंकर यालाच मारले. घटनेनंतर आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव सोनवणे, अमोल कामठे, पोलीस कर्मचारी विवेक सपकाळे, अनिल गायकवाड, अजिनाथ सरक, श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, राजू जाधव (तांत्रिक विभाग), उमेश वानखडे, सोमेश्वर महाडिक, सुहास डंगारे, शहाजी धायगुडे, संजय कुºहाडे, गणेश करपे, ओंकार बंड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.