आधी डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; नंतर मृतदेह जाळून नदीत टाकली राख; पिंपरीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:56 PM2020-06-22T13:56:40+5:302020-06-22T14:00:05+5:30
मारहाण केल्याच्या रागातून खून, तीन महिन्यांनंतर गुन्ह्याची उकल
पिंपरी : भांडणातून मारहाण झाल्याचा राग मनात धरून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून केला. त्यानंतर मृतदेह जाळून त्याची राख नदीत टाकून पुरावा नष्ट केला. खून झाल्यानंतर तीन महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी येथे हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
जसबीरसिंग ऊर्फ बिल्लू ऊर्फ विक्की गुलजारसिंग विरदी (वय १९, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निरज अशोक जांगयानी (वय २६, मेन बजार, पिंपरी), ललीत लालचंद ठाकूर (वय २१, रा. वैष्णोदेवी मंदिरामागे, पिंपरी), योगेश केशव पंजवाणी (वय ३१, रा. संजय लायब्ररी लेन, गुरुव्दाराजवळ, पिंपरी) आणि हरजोतसिंग रणजितसिंग लोहीट (वय २२, रा. वैष्णोदेवी मंदिराजवळ, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसबीरसिंग विरदी आणि त्याचा भाऊ सनी गुलजारसिंग विरदी या दोघांनी आरोपी निरज जांगयानी याला मारहाण केली होती. दि. ७ मार्च २०२० रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी निरज जांगयानी याने त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर निरज जांगयानी आणि इतर आरोपी पिंपरी येथील डेअरी फार्म रोड येथील गोठ्यामध्ये दारू पित बसले होते. दरम्यान आरोपी हरजोतसिंग लोहीट हा रात्री बाराच्या सुमारास जसबीरसिंग विरदी याला घेण्यासाठी पिंपरी येथील रिव्हर रोड येथे आला. तेथून आरोपी हरजोतसिंग हा जसबिरसिंग विरदी याला घेऊन डेअरी फार्म रोड येथील गोठ्यात रात्री साडेबाराच्या सुमारास पोहचला. तेथे दारू पित असलेला आरोपी निरज जांगयानी व इतर आरोपी यांनी जसबीरसिंग याचा गळा दाबून व त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. त्यानंतर गोठ्यातील चारा, कचपान, वाळलेली काटके तसेच वाळलेले शेण टाकून त्याचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर त्याची राख दापोडी येथे पुलावरून नदीपात्रात टाकून पुरावा नष्ट केला.
बेपत्ता झाल्याची मार्चमध्ये केली होती नोंद
दरम्यान, जसबीरसिंग विरदी हा दि. ७ मार्च रोजी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे नोंद केली होती. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपींनी त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.