मित्राची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 07:13 PM2019-10-07T19:13:14+5:302019-10-07T19:13:44+5:30
फिर्यादी आणि त्यांच्या आईने आरोपींना तुम्ही आरतीमध्ये येऊन का गोंधळ घातला, अशी विचारणा केली
पिंपरी : मित्राची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. वाल्हेकरवाडी येथे शनिवारी (दि. ५) ही घटना घडली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमित सुभाष पोटे (वय २७, रा. वाल्हेकरवाडी, चिचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुरज दिलीप जगताप (वय २५, रा. चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मयूर लोखंडे (वय २५, रा. दत्तवाडी आकुर्डी), पंकज जगताप (वय २५, रा. वाल्हेकरवाडी), किशोर इंगळे (वय २२, रा. वाल्हेकरवाडी) आणि जैद मुजावर (वय २६, रा. वाल्हेकरवाडी) यांच्यासह एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुजावर आणि फिर्यादी यांच्यात पूर्ववैमनस्य होते. शनिवारी रात्री फिर्यादी जगताप यांच्या घरी देवीची आरती सुरू होती. त्यावेळी सर्व आरोपी टोळक्याने फियार्दीच्या घरात शिरले व जगताप याला बाहेर ओढून नेऊ लागले. मात्र, आरतीसाठी अनेक लोक आल्याने त्यांनी जगताप याला बाहेर नेऊन दिले नाही. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. मात्र, रात्री ११ वाजता जगताप यांना घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून काही मुलांचा जोरजोराने बोलण्याचा आवाज आला. त्यामुळे ते आणि त्यांची आई घराच्या मागे गेले असता सर्व आरोपी तेथेच बसलेले होते. फिर्यादी आणि त्यांच्या आईने आरोपींना तुम्ही आरतीमध्ये येऊन का गोंधळ घातला, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपी आणि या दोघांमध्ये वाद झाला. भांडणाचा आवाज ऐकून जगताप यांचा मित्र अमित पोटे तेथे आला. तो भांडणे सोडवू लागला. त्याचवेळी आरोपींनी कोयते आणि लोखंडी दांडक्याने फियादी त्यांची आई आणि पोटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांची आई तसेच अमित पोटे पळून जाऊ लागले. आरोपींनी पोटे याला पकडून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात पोटे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.