वाठोड्यात तरुणाची हत्या, परिसरात थरार, अज्ञात आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:14 AM2020-09-19T00:14:32+5:302020-09-19T00:14:56+5:30
यश मधुकर ठाकरे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून तो हुडकेश्वर मधील झोपडपट्टीत राहत होता.
नागपूर : अज्ञात कारणावरून एका तरुणाची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. यश मधुकर ठाकरे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून तो हुडकेश्वर मधील झोपडपट्टीत राहत होता. यश ठाकरेविरुद्ध काही महिन्यांपूर्वी लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले होते. मे महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला त्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याने क्वॉरेन्टीन करण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, यश काही दिवसांपासून एका पेट्रोल पंपावर काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊतनगर जवळ पडून असल्याची माहिती कळाली. त्यामुळे वाठोड्याचे ठाणेदार अनिल ताकसांडेआपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले. आरोपींनी यशच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक घाव घालून त्याला ठार मारले होते.
दरम्यान, माहिती कळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनीही घटनास्थळी भेट दिली. ही हत्या दोन आरोपींनी केल्याचा संशय आहे. मात्र कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली ते ते रात्री १० वाजेपर्यंत उघड झाले नव्हते. आरोपींचा शोध घेण्यासाठी वाठोडा पोलिसांची पथके वेगवेगळ्या भागात चौकशी करत होती. पोलीस उपायुक्त मासाळ हेसुद्धा पोलीस ठाण्यात संशयितांची चौकशी करीत होते.
अनेकांची धरपकड
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अनेक संशयितांची धरपकड केली. पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू होती.
गुन्हे शाखेने पकडले आरोपी
गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धावपळ करून आरोपी इम्तियाज अली आणि शेख आसिम या दोन आरोपींना मध्यरात्री अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.