डोळे काढून बघितले म्हणून केला खून : नागपुरातील पिपळा मार्गावर थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 07:59 PM2020-03-14T19:59:47+5:302020-03-14T20:09:06+5:30
क्षुल्लक कारणावरून दोघांनी एका सरळसाध्या तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी रात्री ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षुल्लक कारणावरून दोघांनी एका सरळसाध्या तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. रवींद्र राधेश्याम भोंगाडे (वय २२) असे मृताचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिपळा मार्गावरील सिद्धेश्वरी नगरात राहत होता. शुक्रवारी रात्री ही थरारक घटना घडली. दिलीप हिरालाल उईके आणि अंकित भोसले अशी आरोपींची नावे आहेत. ते पिपळा मार्गावरच राहतात.
मृत भोंगाडे हा अत्यंत सरळमार्गी आणि कुणाच्याही कामात धावून जाणारा होता. तो त्याचे वडील आणि भाऊ गवंडी काम करायचे. तो राहत असलेल्या पिपळा मार्गावर एकाचे शुक्रवारी निधन झाले. त्याच्याकडे दरी आणि पडदा पाहिजे होता तो आणण्यासाठी भोंगाडे डेकोरेशनवाल्याकडे जात होता. रस्त्यात असलेल्या फ्रेण्डस पान सेंटरवर रात्री ७ च्या सुमारास तो थांबला. त्याचवेळी तेथे आरोपी उईके आणि भोसले आले. ते दारूच्या नशेत टुन्न होते. त्यांची आणि भोंगाडेची नजरानजर झाली. आमच्याकडे डोळे काढून का बघतो, असे विचारत आरोपी उईके आणि भोसलेने भोंगाडेला शिवीगाळ केली. कारण नसताना का शिवीगाळ करतो, अशी विचारणा केल्यामुळे भोंगाडेला आरोपींनी मारहाण केली. त्यामुळे भोंगाडेनेही एक थापड एका आरोपीला मारली. त्यानंतर ‘निकाल रे सामान’ म्हणत आरोपींनी धारदार चाकू काढून भोंगाडेच्या पोटावर, छातीवर भोसकून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. तो ठार झाला असे समजून शिवीगाळ करीत आरोपी पळून गेले. परिसरातील नागरिकांनी भोंगाडेला मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भरती केले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, माहिती कळताच हुडकेश्वर पोलीस पोहचले. रवींद्रचे वडील राधेश्याम हिरालाल भोंगाडे (वय ४६) यांची तक्रार नोंदवून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार राजकमल वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धावपळ करीत शनिवारी दोन्ही आरोपींना अटक केली.
परिसरात शोकसंतप्त वातावरण
सरळमार्गी स्वभागाच्या रवींद्र भोंगाडेची हत्या झाल्याचे कळताच परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांनी कोणताही वाद नसताना किंवा कारण नसताना केवळ डोळे काढून का बघतो, असे विचारत रवींद्रला मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याची हत्याही केली. त्यामुळे परिसरात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले आहे.