पाकीट मारताना पकडल्याने केली हत्या, पोलिसांकडून पाकिटमाराला अटक
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 8, 2022 04:43 PM2022-09-08T16:43:52+5:302022-09-08T16:44:09+5:30
महापे येथील घटना : बेघर व्यक्तीचा आढळला होता मृतदेह
नवी मुंबई : बेघर व्यक्तीचे पाकीट मारत असताना त्याने विरोध केल्याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी पाकिटमाराला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ११ संप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिळफाटा मार्गावरील महापे येथील पुलाखाली बेघर व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. व्यंकटेश शेट्टी उर्फ अण्णा (५५) असे मयत व्यक्तीचे नाव असून ते पुलाखालीच रहायला होते. रविवारी सकाळी त्यांचा राहत्या ठिकाणी मृतदेह आढळून आला होता. डोक्यात दगड घालून त्यांची हत्या झालेली होती. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी निरीक्षक सुनील कदम, सहायक निरीक्षक प्रभाकर शिऊरकर यांचे पथक केले होते. त्यांनी गुन्ह्याचा उलगडा करत मारेकरू आकाश चव्हाण (२६) याला रबाळे एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री आकाश हा त्या परिसरातून भटकत होता. यावेळी त्याने पुलाखाली झोपलेल्या व्यंकटेश शेट्टी यांचे पाकीट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु शेट्टी यांनी विरोध केल्याने संतापात आकाश याने त्यांच्या डोक्यात दगड मारला होता. यातच ते जखमी होऊन जागीच मृत पावल्याची कबुली त्याने दिली असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी सहायक आयुक्त गजानन राठोड, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.