तरुणीची गळा कापून केली हत्या; सीसीटीव्हीमुळे सापडला आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 03:06 PM2019-05-03T15:06:14+5:302019-05-03T15:13:03+5:30
मयुरीची हत्या करणाऱ्या आरोपी अमोल गणपत औधारे (28) याला पोलिसांनी अटक केले आहे.
नालासोपारा - विरार पूर्वेकडील साईनाथ पेट्रोल पंपाच्या जवळील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये रूम नंबर बी/302 मध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय मयुरी महेश मोरे हीची शनिवारी संध्याकाळी घरी एकटी असताना चाकूच्या सहाय्याने गळा चिरून हत्या झाली होती. विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. पण तपासादरम्यान परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमुळे खुनाचा गुन्हा 24 तासात उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर हत्या ही प्रेमप्रकरणामुळे झाली आहे. मयुरीची हत्या करणाऱ्या आरोपी अमोल गणपत औधारे (28) याला पोलिसांनी अटक केले आहे.
मयुरीची हत्या झाल्यानंतर पती महेशने विरार पोलिसांत तक्रार दिल्यावर पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी घरी धाव घेऊन सीसीटीव्ही लागलेले पाहिल्यानंतर ऑपरेटर कडे जाऊन तपासणी केले असता खून झालेल्या दिवशी 27 ला अनोळखी एक जण रात्री 8 वाजता घरी येऊन गेल्याचे व दुसऱ्या दिवशी 28 ला सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी तोच अनोळखी तरुण सीसीटीव्ही केमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसले. पोलिसांनी महेशजवळ विचारपूस केल्यावर मयुरीच्या कामावरील एक तरुण नेहमी घरी येजा करायचा ही माहिती मिळाल्यावर त्याचे नाव व पत्ता घेऊन त्यादिशेने तपासाला सुरुवात केली. नालासोपारा येथे राहणाऱ्या अमोल गणपत औधारे (28) याने हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय होता. पोलीस त्याच्यामागावर होते आणि त्याला बोरिवली येथून त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे गुन्ह्याबद्दल विचारणा केल्यावर हत्या केल्याची कबुली देत धक्कादायक माहिती दिली की, हत्येच्या दिवशी घरी गेल्यावर मला तू भेटायचे नाही, माझ्या घरी येऊ नकोस, दुसऱ्या इसमासोबत माझे प्रेमसंबंध जुळलेले आहे असे बोलल्यावर रागाच्या भरात चाकूने गळ्यावर वार केले.
मयुरीची हत्या झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज प्राप्त करून तपासाला सुरुवात करत पतिकडूनही माहिती मिळाल्यावर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची टीम बनविण्यात आली होती. आरोपी अमोल गणपत औधारे याला बोरिवली येथून अटक केले असून वसई न्यायालयात हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - अनिल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे