सात चोऱ्या करीत रक्षकावर खुनी हल्ला; आरोपी ताब्यात, दोघेही अल्पवयीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 12:32 AM2021-01-22T00:32:43+5:302021-01-22T00:35:07+5:30
चितळसर, मानपाडा येथील जयभवानीनगर भागात राहणाऱ्या या दोघांनी १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील एका रिक्षा चालकाकडून मोबाइल आणि काही रोकड जबरीने हिसकावून मोटारसायकलीवरून पलायन केले.
ठाणे: एकाच रात्रीत सात जबरी चोऱ्या करीत सुरक्षारक्षकावर चाकूचे वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलांना चितळसर पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात मोबाइल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी गुरुवारी दिली.
चितळसर, मानपाडा येथील जयभवानीनगर भागात राहणाऱ्या या दोघांनी १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील एका रिक्षा चालकाकडून मोबाइल आणि काही रोकड जबरीने हिसकावून मोटारसायकलीवरून पलायन केले. त्यानंतर पुन्हा एक तासाच्या अंतराने त्याच भागातील शुभारंभ सोसायटीमधील एका सुरक्षारक्षकाकडून मोबाइल आणि रोकड हिसकावून पळ काढला. तिसऱ्या घटनेमध्ये १८ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एका रिक्षा चालकाकडून ४५० रुपयांची रोकड लुबाडली. पुढे मानपाडा येथील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटलमधील एका घराची खिडकी उचकटत असताना त्यांना हटकणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या छातीवर आणि पोटावर त्यांनी चाकूने वार केला. त्याच काळात त्यांनी वर्तकनगर भागात दोन आणि नौपाडा भागातील एका ठिकाणी जबरी चोरीचा प्रकार केला.
एकाच रात्रीमध्ये अवघ्या काही तासांच्या अंतराने ही लुटमार सुरू असल्याची माहिती चितळसर पोलिसांना ठाणे नियंत्रण कक्षातून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना लगेचच ताब्यात घेतले.
मुद्देमाल हस्तगत -
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात मोबाइल, मोटारसायकल आणि दोन सुरे असा एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.