संघटित गुन्हेगारीचा विदर्भात खुनी खेळ; दोन वर्षांत पाचशेवर मर्डर, शेकडो हाफमर्डर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:08 AM2021-01-25T06:08:53+5:302021-01-25T06:09:09+5:30
सध्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये बंदूक दाखल झाली आहे. ज्या टोळीकडे बंदूक असेल त्या टोळीचे वर्चस्व अशी स्थिती सध्या आहे.
संघटित टोळ्या, त्यांच्यातील वर्चस्वाचा खुनी संघर्ष, गावगुंडांमधील आपसी लढाया यामुळे विदर्भातील गुन्हेगारीचा ग्राफ गेल्या दोन-चार वर्षांत दिवसेंदिवस रक्तरंजित होत चालला आहे. गुन्हेगारांकडे अत्याधुनिक हत्यारे येत आहेत. चाकू-तलवारींचा जमाना गेला, आता बंदुका-कट्ट्यांनी वैरी संपवले जात आहेत. दोन वर्षांत विदर्भात पाचशेवर मर्डर, शेकडो हाफमर्डर झाले. हेमंत नगराळे यांनी पोलीस महासंचालक म्हणून सूत्रे हाती घेताच हिस्ट्रीशीटर, गावगुंड, टोळ्यांच्या बंदोबस्ताचे फर्मान काढले आहे. ते मूळचे विदर्भातील. त्यामुळे साहजिकच विदर्भातील गुन्हेगारीकडे त्यांचे खास लक्ष असेल. या पार्श्वभूमीवर विदर्भातील गुन्हेगारीची दोन वर्षांची ही एक झलक...
गोंदिया : २ वर्षांत ७० खून, ३२ खुनी हल्ले
दोन वर्षांत संघटित गुन्हेगारीच्या वर्चस्ववादातून आणि आपसी वैमनस्यातून ७० खून पडले, तर ३२ जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बहुतांश खुनात देशी कट्ट्याचा वापर होतो. जिल्ह्यात रेतीमाफियांमुळे मोठ्या प्रमाणात गँगवार होत असतात. गावठी दारू, गांजा, जुगार ते विदेशी नशेचा बाजार मांडून अनेक गुंड गडगंज झाले आहेत. १८ गुन्हेगार तडीपार झाले आहेत.
गांधी जिल्ह्याला गुन्हेगारीचा फास
वर्धा जिल्ह्यात दोन वर्षांत संघटित गुन्हेगारीतून ६९ जण ठार झाले. ७० जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. कारवाईला न जुमानता वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात खून पडत आहेत. २०१९ मध्ये वर्चस्ववादातून ३५ जणांना तर २०२० मध्ये ३४ जणांना संपवले.
ज्या टोळीकडे बंदूक, त्या टोळीचे वर्चस्व
सध्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये बंदूक दाखल झाली आहे. ज्या टोळीकडे बंदूक असेल त्या टोळीचे वर्चस्व अशी स्थिती सध्या आहे. गुन्हेगारांकडून बंदूक हस्तगत करण्याच्या तुरळक कारवाया होतात. मात्र, बऱ्याच गुन्हेगारांकडील अवैध बंदुकींपर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.