मुशीर आलम हत्याकांड : तीन सख्या भावांसह सहा जणांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 09:29 PM2019-11-02T21:29:05+5:302019-11-02T21:30:32+5:30
अमरावती न्यायालयाचा निर्णय
अमरावती - तीन वर्षांपूर्वी शहरात गाजलेल्या मुशीर आलम हत्याकांडप्रकरणी तीन सख्ख्या भावांसह सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राजेश तिवारी यांनी शनिवारी हा निर्णय दिला.
विधिसूत्रानुसार, आजन्म कारावास ठोठावण्यात आलेल्या शिक्षाप्राप्त आरोपींमध्ये उमेश अशोक आठवले (२७), नीलेश अशोक आठवले (२४), दिनेश अशोक आठवले (३२, तिघेही रा. महाजनपुरा), राजेश गोविंद मांडवे (२५, कुंभारवाडा), शुभम तात्याराव जवंजाळ (१९, रा. कुंडखुर्द, ता. भातकुली) व अंकुश सुभाषराव जिरापुरे (२३, खरकाडीपुरा) यांचा समावेश आहे.
१ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास सय्यद मुशीर आलम नियाज अली (३५, साबनपुरा) याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. गांधी चौक ते जवाहर गेट रस्त्यावरील सावजी हॉटेलजवळ ही घटना घडली होती. या हत्याकांडामुळे शहरातील राजकारण तापले होते. महापालिकेतील आमसभाही त्यात गाजल्या होत्या. शहर कोतवाली पोलिसांनी त्यावेळी सहा आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ गुन्हा दाखल करुन सर्वाना अटक केली.