"साहिलला दारुचं व्यसन, मुस्कानने व्हॉइस मेसेज पाठवला अन्..."; ड्रायव्हरचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:52 IST2025-03-22T13:52:22+5:302025-03-22T13:52:55+5:30
सौरभ राजपूत हत्येच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याची पत्नी मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लासोबत मिळून त्याची निर्घृण हत्या केली

"साहिलला दारुचं व्यसन, मुस्कानने व्हॉइस मेसेज पाठवला अन्..."; ड्रायव्हरचा खळबळजनक खुलासा
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभ राजपूत हत्येच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याची पत्नी मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लासोबत मिळून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेत दररोज नवीन खुलासे होत आहेत. सौरभची हत्या केल्यानंतर, साहिल आणि मुस्कानला मेरठहून शिमला-मनाली येथे घेऊन जाणाऱ्या कॅब ड्रायव्हरने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पबमध्ये नाचण्यापासून ते वाइन पार्टी आणि केक कापण्यापर्यंतचे व्हिडीओ समोर आले आहेत.
अजब सिंह नावाच्या कॅब ड्रायव्हरने सांगितलं की ते दोघेही मागच्या सीटवर बसायचे. या काळात ते क्वचितच एकमेकांशी बोलत असत. जेव्हा जेव्हा कोणी त्यांना फोन करायचं तेव्हा ते बाहेर जाऊन बोलायचे. साहिलला दारूचं व्यसन होतं आणि तो दिवसाला ३ बाटल्या दारू प्यायचा. मुस्कानही कधीकधी त्याच्यासोबत दारू पित असे.
मेरठमध्ये पती सौरभची हत्या केल्यानंतर शिमला येथे मौजमजा करण्यासाठी गेलेल्या मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लासाठी तिथे केक ऑर्डर केला होता. दोघांचा केक कापतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. तिने व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेज पाठवला आणि केक आणण्यास सांगितले. ड्रायव्हरने पोलिसांना या संभाषणाबद्दल माहिती दिली आहे.
मुस्कानने संध्याकाळी ७ वाजता कॅब ड्रायव्हरला मेसेज केला आणि त्याला सांगितलं की दुसऱ्या दिवशी साहिलचा वाढदिवस आहे आणि केक आणून १२ वाजता देण्यास सांगितलं. मग तिने व्हॉइस मेसेज पाठवला की तू कुठूनही केक आण आणि मला फोन करू नकोस, फक्त मेसेजद्वारे बोल. केक आणल्यावर मला सांग की माझ्याकडे काही सामान आहे, ते ठेवा. आरोपी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला कसोलमध्ये होळी साजरी करताना दिसत आहेत.