म्हैसूर महाराजांच्या निकटवर्तीयाला फसविले; 117 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 09:33 AM2019-11-21T09:33:06+5:302019-11-21T09:35:52+5:30
टॅक्सीडर्मिस्ट म्हणजे मृत झालेल्या प्राण्यांच्या चामडीपासून हुबेहूब त्याच प्राण्याची प्रतिकृती तयार करणारा.
नवी दिल्ली : म्हैसूर महाराजांच्या निकटवर्तीय राहिलेल्या ब्रिटिश टॅक्सीडर्मिस्टला एका व्यक्तीने ठकविल्याचा प्रकार समोर आला होता. त्याच्यावर थेट ईडीनेच कारवाई करत त्याची 117 कोटी रुपयांची संपत्तीच जप्त केली आहे. हा प्रकार या व्यक्तीला चांगलाच महागात पडला आहे. टॅक्सीडर्मिस्ट म्हणजे मृत झालेल्या प्राण्यांच्या चामडीपासून हुबेहूब त्याच प्राण्याची प्रतिकृती तयार करणारा. ईडीने या कारवाईची बुधवारी माहिती दिली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की म्हैसूरमध्येच राहणारा आरोपी आणि घोड्यांचा प्रशिक्षक मायकल एफ. ईश्वर याच्या विरोधात पैशांची अफरातफर केल्याने कारवाई करण्याचा आदेश आला होता. कारवाईवेळी त्याच्याकडून 70 बहुमुल्य ट्रॉफी शिवाय सागाचे फर्निचर, म्हैसरच्या हैदर अली रोडवरील एक घर आणि केरळच्या वायनाडमधील कॉफीचे मळे जप्त करण्यात आले. या संपत्तीची एकूण किंमत 117.87 कोटी रुपये एवढी आहे.
राजघराण्याचे निकटवर्तीय एडविन जॉबर्ट वान इनगेन हे भारतातच राहतात. त्यांच्यासोबत ईश्वरने फसवणूक केली होती. ईश्वरने खोटे मृत्यूपत्र बनवून इनगेन यांना महाराजांनी भेट दिलेल्या संपत्तीवर कब्जा केला होता. याबाबतची तक्रार बेंगळूरू पोलिसांनी 2013 मध्ये केली होती. यावरून ईडीने हे प्रकरण आपल्याकडे घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीआयडी या प्रकरणाची चौकशी करत होती.