'त्या' तरुणीच्या मृत्युचे गूढ कायम; पोलीस व्हिसेरा अहवालाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 07:55 PM2019-01-03T19:55:27+5:302019-01-03T19:57:11+5:30
पोलीस पुढील तपासासाठी व्हिसेरा आणि हिस्टो पॅथॉलॉजी अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मुंबई - मुलुंड येथील एका २१ वर्षीय तरुणीचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हि दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपासासाठी व्हिसेरा आणि हिस्टो पॅथॉलॉजी अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मुलुंड येथे राहणारी निपा गाला (२१) ही थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळा येथे मित्रमैत्रिणींसोबत गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला सकाळी निपा घरी आली. सायंकाळी निपा बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने तिचे वडील नितीन गाला हे घरी आले. त्यांना बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी जायचं असल्याकारणाने नितीन हे बाथरूमजवळ गेले. मात्र, आत त्यांची मुलगी निपा असल्याने ते १० मिनिटं थांबले. नंतर १ तासभर निपा बाथरूममध्ये असल्याचं कळल्यावर नितीन यांनी बाथरूमच्या दरवाज्यावर जाऊन पहिले तर पाण्याचा आवाजही येत नव्हता. शेवटी त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला आणि आत पहिले तर निपा बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. नातेवाईकांनी निपाला प्लॅटिनम रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. निपाचा मृत्यू हा बाथरूममध्ये गुदमरून झाला असल्याचा तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. मुलुंड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदनाचा अहवाल आला. मात्र, या अवहलातून मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने पोलिसांनी पुढील तपासाकरिता व्हिसेरा आणि हिस्टो पॅथॉलॉजी अहवालासाठी नमुने पाठविले आहेत. या अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे काळे यांनी सांगितले.