नागपुरातील व्यापाऱ्याला अमेरिकेत कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:14 PM2020-07-10T21:14:53+5:302020-07-10T21:16:43+5:30
प्रतिबंधित औषधांची तस्करी तसेच मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात नागपुरातील जितेंद्र ऊर्फ जितू हरीश बेलानी (वय ४०) नामक व्यक्तीला अमेरिकेतील न्यायालयाने तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिबंधित औषधांची तस्करी तसेच मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात नागपुरातील जितेंद्र ऊर्फ जितू हरीश बेलानी (वय ४०) नामक व्यक्तीला अमेरिकेतील न्यायालयाने तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे.
जितू बेलानी हा जरीपटका येथील रहिवासी असून त्याचे सेंट्रल एव्हेन्यूवर कार्यालय आहे. तो ऑनलाईन औषध विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याने अमेरिकेसह अनेक देशांमध्ये प्रतिबंधित असलेल्या औषधांची विक्री करून मोठ्या प्रमाणात रक्कम मिळविल्याचा त्याच्यावर आरोप होता. ३ जून २०१९ ला बेलानीला झेक गणराज्यमध्ये अमेरिकेच्या एफबीआयने नाट्यमयरीत्या अटक केली होती. तेव्हापासून तो अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने आरोग्यास अपायकारक आणि उत्तेजक प्रतिबंधित असलेल्या औषधांची विक्री करून त्याआधारे मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. चौकशीदरम्यान त्याने आरोप स्वीकारल्याचे समजते. त्यामुळे कोर्टाने त्याला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे. त्याला सुमारे ७५ लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार असल्याची माहिती आहे. कर्णोपकर्णी नागपुरात हे वृत्त पसरले आहे. प्रारंभी बेलानीच्या वतीने कायदेशीर बाजू मांडणारे अॅड. श्याम देवानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, याबाबत आपल्याकडे सविस्तर माहिती नसल्याचे ते म्हणाले.