नागपुरात पत्नीशी सलगी साधणाऱ्याला भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 20:53 IST2020-01-13T20:50:55+5:302020-01-13T20:53:11+5:30
पत्नीशी सलगी साधण्याचा आरोप लावून एकाने दुस-या एका तरुणावर चाकूहल्ला केला. इमामवाड्यातील रामबागमध्ये रविवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरात पत्नीशी सलगी साधणाऱ्याला भोसकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीशी सलगी साधण्याचा आरोप लावून एकाने दुस-या एका तरुणावर चाकूहल्ला केला. यात मोहित विनोद मेश्राम (वय १९) हा तरुण गंभीर जखमी झाला. इमामवाड्यातील रामबागमध्ये रविवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.
मोहित रामबागमध्ये बडवाईक बिल्डींगजवळ राहतो. तो कॅटरर्सवाल्याकडे काम करतो. त्याच्याच वस्तीत वैष्णवी अजय काळे (वय १९) ही राहते. मोहित आणि वैष्णवी दोघे मित्र आहेत. रविवारी दुपारी १ च्या सुमारास ते फिरून वस्तीत आले. घराकडे पायी जात असताना त्यांच्या वस्तीतच राहणारा शूभम राजू डोंगरे (वय २३) हा मोहितजवळ आला. त्याने मोहितला अडवून ‘तू माझ्या पत्नीसोबत ओळख कशाला वाढवली, तू तिच्याशी कशासाठी सलगी साधतो’, असे प्रश्न करून शूभमने मोहितसोबत वाद घातला. बाचाबाची सुरू असतानाच शूभमने जवळचा चाकू काढून मोहितवर सपासप घाव घातले. त्याच्या पोटावर, छातीवर, कपाळावर, गळळ्यावर चाकूचे घाव घालून आरोपी शुभमने मोहितला गंभीर जखमी केले. वैष्णवीने आरडाओरड करून बाजुची मंडळी गोळा केली. तोपर्यंत आरोपी पळून गेला. या घटनेमुळे रामबागमध्ये एकच दहशत निर्माण झाली. शेजा-यांनी गंभीर जखमी झालेल्या मोहितला मेडिकलमध्ये दाखल केले. वैष्णवी हिने इमामवाडा ठाण्यात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राणघातक हल्लयाच्या आरोपाखाली कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला.
अटक आणि पीसीआर
सहायक पोलीस निरीक्षक संतोष मुंढे यांनी आपल्या सहका-यांसह धावपळ करून आरोपी शुभम मोहितेला अटक केली. तो पान टपरी चालवितो. त्याला आज न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मोहितवर हल्ला केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे समजते.