नागपुरात तरुणावर चाकूहल्ला करून रक्कम लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 08:18 PM2020-03-21T20:18:05+5:302020-03-21T20:21:06+5:30
तीन अनोळखी आरोपींनी चाकूहल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केल्यानंतर त्याच्याजवळचे २५०० रुपये हिसकावून नेले. धंतोली पोलीस ठाण्याच्या मागच्या भागातील नागनदीच्या पुलाखाली शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन अनोळखी आरोपींनी चाकूहल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केल्यानंतर त्याच्याजवळचे २५०० रुपये हिसकावून नेले. धंतोली पोलीस ठाण्याच्या मागच्या भागातील नागनदीच्या पुलाखाली शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
सागर शैलेश खोब्रागडे (वय १९) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो रामबाग, इमामवाड्यात राहतो. तो कॉटन मार्केट परिसरात मजुरी करतो. सायंकाळी काम आटोपल्यानंतर सागर त्याच्या व्हेरायटी चौकातील मित्राकडे गेला. त्याच्याकडून अडीच हजार रुपये उधार घेतल्यानंतर सागर यशवंत स्टेडियमजवळून नागनदीच्या पुलाखालून रामबागमध्ये जात होता. पुलाखाली अंधारात पोहचला असताना त्याच्यामागून मोटरसायकलवर तीन आरोपी आले. त्यांनी सागरला मारहाण करून त्याच्याजवळची रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला. सागरने तीव्र प्रतिकार केला. तो विरोध करीत असल्यामुळे आरोपींनी चाकूने त्याच्या छातीवर, मानेवर वार करून सागरजवळचे अडीच हजार रुपये हिसकावून घेतले. जखमी सागरने रस्त्याने येणाऱ्यांची मदत घेऊन धंतोली पोलिसांना कळविले. सहायक निरीक्षक देवाजी नरोटे यांनी त्याला ईस्पितळात पोहचवल्यानंतर त्याच्या बयाणावरून लूटमारीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली. मात्र, शनिवारी दुपारपर्यंत आरोपींबाबत पोलिसांना कसलीही माहिती कळली नाही.
नेहमीच घडतात घटना
रात्रीच्या वेळी नमूद भागात गर्दुले, चरसी, दारुडे, गुन्हेगार यांचा ठिय्या असतो. व्यसन भागविण्यासाठी जमलेली ही मंडळी त्या भागात नेहमीच गोंधळही घालतात. या भागात लूटमारीच्याही घटना नेहमीच घडतात. तरीदेखील या भागात पाहिजे तसा पोलीस बंदोबस्त अथवा गस्त राहत नाही. सीसीटीव्हीदेखील नाही. त्यामुळे बहुतांश गुन्ह्यांत आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागते.