हिंदुस्तानी भाऊला नागपूर पोलीस अटक करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 08:08 PM2022-02-01T20:08:17+5:302022-02-01T20:08:43+5:30
HIndustani Bhau : उलट-सुलट मेसेज पाठवून अफवा पसरवल्या जाऊ शकतात : अफवांना बळी पडू नका : पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे आवाहन
नागपूर : विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन त्यांच्याकडून बेकायदेशीर आंदोलन तसेच हिंसक कृत्य करून घेण्याच्या आरोपाखाली नागपूरपोलिसांनी विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. मुंबई पोलिसांची चौकशी संपल्यानंतर त्याला आम्ही अटक करून नागपुरात आणणार आहोत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांना दिली.
दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षा पद्धती संबंधाने सोशल मीडियावर चिथावणीखोर मेसेज पाठवून विकास फाटक याने मुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून बेकायदा आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. त्याच्या या कृतीमुळे जागोजागी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी तोडफोडही झाली. आधीच कोरोनाचा धोका असताना जागोजागी गर्दी जमल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक तीव्र झाला. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी विकास फाटक याला सोमवारी रात्री अटक केली. दरम्यान, ज्या पद्धतीने सोमवारी चिथावणी देऊन आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे पुन्हा पुढच्या काही तासात असेच उलट-सुलट मेसेज पाठवून अफवा पसरवल्या जाऊ शकतात, अशी माहिती पोलिसांकडे आली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी रात्री पत्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत नागरिकांनाही आवाहन केले आहे. अफवांना बळी पडू नका, सतर्कता बाळगा, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राहील, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची हिंसक घटना कुठे घडणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थी-पालकांनो समजून घ्या
आंदोलनाच्या संबंधाने हिंसक घटना घडल्यास आणि कुण्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. नोकरीसाठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे पासपोर्ट तयार करून घेण्यास अडचण आल्याने विदेशात शिक्षण, नोकरीसाठी जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
इंस्टाग्रामवरून जमवाजमव
सोमवारी नागपुरात करण्यात आलेल्या आंदोलनाची सुरुवात इंस्टाग्रामवरील मेसेजच्या माध्यमातून झाली. एकमेकांना मेसेज देतानाच तो व्हायरल करून बाहेर कुणाला काही सांगायचे, बोलायचे नाही, असे सांगण्यात आले होते. यासाठी वाडीतील काही तरुणांचा पुढाकार होता. त्यांनीच प्रारंभी अडीचशेवर तरुणांची जमवाजमव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.