नागपूर सत्र न्यायालय : आरोपीला १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:07 PM2020-01-31T23:07:51+5:302020-01-31T23:09:24+5:30
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना गणेशपेठ पोलिसांच्या हद्दीतील आहे.
भोलासिंग ऊर्फ राहुल दिलीपकुमार उदेह (१८) असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेश येथील रहिवासी व व्यवसायाने मजूर आहे. ही घटना मार्च-२०१७ मध्ये उघडकीस आली. त्यावेळी पीडित मुलगी १६ वर्षे वयाची होती. मुलगी सुद्धा मध्य प्रदेशातील मुळ रहिवासी असून तिचे कुटुंबिय मजुरीसाठी गणेशपेठ पोलिसांच्या हद्दीत रहात होते. आरोपीचे तेथे जाणेयेणे होते. दरम्यान, त्याने लग्नाचे आमीष दाखवून मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. माधुरी मोटघरे यांनी कामकाज पाहिले.