जमीन देतो म्हणून बिल्डरची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:32 PM2020-01-21T23:32:38+5:302020-01-21T23:32:47+5:30
बांधकाम व्यावसायिकाला वसई पूर्वेकडील गावात ३ गुंठे जमीन आणि १ तयार गाळा देतो असे सांगून आरोपीने लाखो रुपये घेऊन फसवणूक केली
नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला वसई पूर्वेकडील गावात ३ गुंठे जमीन आणि १ तयार गाळा देतो असे सांगून आरोपीने लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तुळिंज पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथील ओस्तवाल बिल्डिंगमध्ये राहणाºया आणि बांधकाम व्यावसायिक असलेल्या शिवकुमार रामखिलावत यादव (३९) यांना आरोपी मनोजकुमार एच. सिंग याने फेब्रुवारी २०१४ मध्ये वसई पूर्वेकडील मौजे राजावली गावातील सर्व्हे नंबर ५६, हिस्सा नंबर २ या जमीन मिळकतीपैकी ३ गुंठे खुली जागा व त्यापैकी १०/३० चौरस फुटाचा तयार गाळा विकत घेण्यासाठी शिवकुमार यांच्या साईश्रद्धा बिल्डिंगमधील गाळा नंबर १२ मध्ये ओमसाई इंटरप्रायजेस नावाच्या कार्यालयात व्यवहार ठरवला.
तीन लाख रुपये गुंठ्याप्रमाणे ३ गुंठ्याचे ९ लाख रुपये आणि एक तयार गाळ्याचे ३ लाख असा एकूण १२ लाख रुपयांचा व्यवहार ठरवण्यात आला. ठरलेल्या व्यवहाराचे पैसे ७ लाख ९० हजार धनादेश व २ लाख ३८ हजार रुपये रोख असे एकूण १० लाख २८ हजार रुपये आरोपीला दिले, पण अद्याप जमीन व गाळा न दिल्याने फसवणूक केली म्हणून तुळिंज पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.