रिक्षाचालकाचा बळजबरीचा प्रयत्न फसला, तरूणीच्या प्रसंगावधानामुळे नराधम पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:22 AM2019-11-29T00:22:30+5:302019-11-29T00:22:46+5:30
बुधवारी रात्रीच्या सुमारास एका रिक्षाचालकाने २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग करत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
पारोळ/नालासोपारा : बुधवारी रात्रीच्या सुमारास एका रिक्षाचालकाने २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग करत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणीने प्रसंगावधान राखत रिक्षातून उडी घेत स्वत:ला या रिक्षाचालकाच्या तावडीतून सोडवले. घटनेनंतर रिक्षाचालक फरार झाला असला तरी दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. इक्र ाम उल शेख असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेतील कोळीवाडा येथील पीडित २२ वर्षीय तरूणी बोईसर येथील डी-मार्टमध्ये कामाला आहे. कामावरून घरी परतत असताना वसई पश्चिमेतील हृषीकेश हॉटेलजवळ ती रिक्षाची वाट पाहत उभी होती. यावेळी इक्राम उल हक हा रिक्षावाला तिथे आला. तरूणीने त्याला कोळीवाडा जाणार का? असे विचारल्यानंतर त्याने नाही असे उत्तर दिले आणि तो पुढे जाऊ लागला. परंतु एकटी तरूणी पाहून त्याने आपला निर्णय बदलला आणि पीडित तरूणीला पुन्हा बोलावून कोळीवाडा जाईल, असे सांगत तिला रिक्षात बसण्यास सांगितले. मात्र या नराधमाने रिक्षाचा वेग काढून घाईगडबडीने रिक्षा चालवायला सुरूवात केली.
यावर तिने रिक्षा हळू चालव असे त्याला सांगितल्यानंतर त्याने त्या तरूणीला ‘तुम्हारी जिंदगी अब मेरे हात में है, जादा होशियारी दिखाने की नही’, असे सांगत तो रिक्षा आणखीच वेगाने चालवू लागला. काहीतरी काळंबेरं घडणार या भितीने तरूणीने चालत्या रिक्षातून वसई पश्चिमेतील साई सव्हिर्सजवळ उडी मारून स्वत:चा जीव कसाबसा वाचवला. या प्रकारानंतर रिक्षा चालक घटनास्थळावरून फरार झाला. आजूबाजूच्या लोकांनी पीडितेला मदत करून सावरले. या अपघातात तिचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे.