मुलाला ‘शेंबड्या’ म्हणणे मुलीच्या जिवावर बेतले; अल्पवयीन मुलगा फरार, आरोपीच्या वडिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 10:31 AM2023-12-07T10:31:40+5:302023-12-07T10:31:52+5:30
मुलाने हत्या केल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह बाजूच्या घरात टाकल्याची माहिती समोर आली.
नालासोपारा : शेजारी राहणाऱ्या लहान मुलीने चिडवले म्हणून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पेल्हार पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही हत्येची घटना आरोपी मुलाच्या वडिलांना माहिती असूनही त्यांनी लपवली होती.
मुलाने हत्या केल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह बाजूच्या घरात टाकल्याची माहिती समोर आली. सध्या अल्पवयीन मुलगा फरार असून, आरोपी मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. वसई फाटा येथे ४ डिसेंबरला एका आठ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बंद घरातील मोरीत आढळून आला. तिचे पाय नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीत होते. चांदनी साह असे मृत मुलीचे नाव आहे. ती जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. १ डिसेंबरला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घराजवळील दुकानात आइस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेली आणि त्यानंतर ती अचानक गायब झाली. त्याबाबत बेपत्ता तक्रार १ डिसेंबरला तिच्या वडिलांनी पेल्हार पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
पोलिसांनी अधिक तपास केल्यावर त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा गायब असल्याचे कळले.
पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांजवळ चौकशी केली असता खुनाच्या हत्येचा उलगडा झाला. मृत मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलाला शेंबड्या शेंबड्या चिडवत होती. रागाच्या भरात १ डिसेंबरला त्याने तिचा गळा दाबून हत्या केली. त्याने ही घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी घटना लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह बंद खोलीमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होते. या घटनेमुळे खळबळ उडाली हाेती.
गोणीत सापडला चिमुकलीचा मृतदेह
घरच्यांनी चिमुकलीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला २० हजारांची रक्कमही देण्याचे जाहीर केले होते. ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मागील एका चाळीत चिमुकलीचा मृतदेह आढळला. पाच नंबर बंद रूममध्ये मोरीत एका प्लास्टिकच्या गोणीत
पाय बांधलेल्या अवस्थेत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदन अहवालासाठी पाठवला. चिमुकलीला गळा दाबून ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.