आरोपीला पकडण्यात नालासोपारा पोलिसांना मिळाले यश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 06:16 PM2022-12-06T18:16:10+5:302022-12-06T18:16:51+5:30

५०० इमारती, १०० सीसीटीव्ही, अनेक रिक्षा... असा लागला शोध

Nalasopara police succeeded in nabbing the accused | आरोपीला पकडण्यात नालासोपारा पोलिसांना मिळाले यश

आरोपीला पकडण्यात नालासोपारा पोलिसांना मिळाले यश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): पाटणकरपार्क परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा नकली पिस्तुल दाखवून सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून ५०० इमारती, १०० सीसीटीव्ही व अनेक रिक्षा असा शोध घेत आरोपीला अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. 

नालासोपाऱ्याच्या शत्रूंजय बिल्डिंगमध्ये सुरेशकुमार धाकड (५८) यांच्या मालकीच्या नेकलेस ज्वेलर्स दुकानात २६ नोव्हेंबरला दुपारी एकटेच असताना दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपीने दुकानात प्रवेश केला. दुकान मालकाशी बोलत बहीण येत असल्याचे सांगून दागिने बघत असताना आरोपीने हातात नकली पिस्तूल काढून त्यांना दाखवले. दुकान मालकाने आरोपीला प्रतिकार केल्याने दोघांमध्ये १० मिनिटे हाणामारी व झटापट झाली होती. आरोपी सोन्याचे दागिने लुटून पळून गेला होता. विशेष म्हणजे या दुकानातील सीसीटीव्ही बंद होते. नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून आरोपी पश्चिमेपासून पूर्वेकडील परिसरात गेलेल्या ५०० पेक्षा जास्त इमारती पोलिसांनी तपासल्या आहेत. आरोपीने पोलिसांच्या ताब्यात मिळू नये म्हणून कार एका ठिकाणी पार्क करून हेल्मेट हातात घेतले. तसेच नवीन कपडे खरेदी करून ते जुने कपडे बदलून अनेक इमारतीतून बाहेर पडत रिक्षा बदलत पार्किंग केलेल्या स्वतःच्या कारने घरी गेला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी उत्कृष्ट पद्धतीने तपास करून दिवा येथे राहणाऱ्या आरोपी कमलेश गुप्ताला ३० नोव्हेंबरला ताब्यात घेऊन अटक केले. आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन ज्या ठिकाणी चोरलेले दागिने विकले तेथून १ लाख ९८ हजार रुपये किंमतीचे ५१ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली कार आणि वापरलेले बनावट पिस्तुल सदृश्य हत्यारही जप्त करण्यात आले आहे. सदर टीमचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी स्वतः नालासोपारा पोलीस ठाण्यात येऊन अभिनंदन केले आहे. तर सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी ५ हजारांचे रिवोर्ड दिले आहे. आरोपीवर रबाळे, नागपाडा, वाशी, कोपरखैरणे याठिकाणी गुन्हे दाखल असल्याचेही कळते.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त सदानंद दाते, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल सोनावणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडीत मस्के, अमोल तळेकर, पोलीस हवालदार किशोर धनु, पोलीस नाईक अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटुलकर, एन ढोणे यांनी केलेली आहे. ज्वेलर्स लुटीप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे. आरोपीला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे चंद्रकांत जाधव (सहायक पोलिस आयुक्त) म्हणाले.

Web Title: Nalasopara police succeeded in nabbing the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.