अपहरण झालेल्या नेपाळी अल्पवयीन मुलीचा नालासोपारा पोलिसांनी लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 06:45 PM2023-12-13T18:45:37+5:302023-12-13T18:46:03+5:30
मुलगी नालासोपारा परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- नेपाळच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्या मुलीचा शोध घेण्यात नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ देशातील रुपन्देही पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असुन सदर मुलगी नालासोपारा परीसरामध्ये राहत असलेबाबत किन इंडिया संस्थेचे निर्देशक नवीन टेकलाल जोशी व लक्ष्मी बिस्ट खडका यांना माहीती मिळाली. त्यानंतर नेपाळी राजदुतावास यांच्या निर्देश व परवानगीने सदर अल्पवयीन मुलीचा शोध घेवून तिला तिच्या पालकांचे ताब्यात देणेकरीता नवीन जोशी हे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधकक्ष नालासोपारा येथे आले. त्यांनतर त्यांनी सदर अपहरणाची माहीती दिल्यावर तात्काळ अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ अपहरीत मुलीचा शोध घेण्यासाठी मिळालेल्या माहीतीनुसार धानीवबाग येथे शोध सुरू केला. सलग दोन दिवस तांञिक माहीतीच्या आधारे धानीवबाग येथील चाळीेंमध्ये तिचा शोध घेतल्यावर ती मिळुन आली. तिला पालघरच्या बालकल्याण समितीकडे हजर करुन तिला किन इंडियाचे निर्देशक नवीन जोशी व लक्ष्मी बिस्ट खडका यांचेकडे नेपाळी राजदुतावास, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तीच्या पालकांच्या ताब्यात देण्याकरीता नेपाळ देशात पाठविण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, पोलीस हवालदार रोशन नारायण किणी, महेंद्र पुंडलिक शेटये, सुनिल विष्णु पागी, महिला पोलीस हवालदार साक्षी डोइफोडे, काजल प्रदीप पाटील यांनी केली आहे.