दहशतवादी हल्ल्याच्या अफवेने नालासोपाऱ्यात पोलिसांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 00:01 IST2019-07-11T23:52:36+5:302019-07-12T00:01:28+5:30
सोशल मीडियावर मेसेज वायरल; मॅसेज करण्यात आलेला मोबाईल नंबर अमेरिकेतील न्यूयार्कचा

दहशतवादी हल्ल्याच्या अफवेने नालासोपाऱ्यात पोलिसांची उडाली तारांबळ
नालासोपारा - पूर्वेकडील राधानगर परिसरात 20 जणांची टोळी गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दहशतवादी हल्ला करणार असल्याची माहिती पालघर नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअपवर आली. या मॅसेजमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. हा मॅसेज 2.19 वाजता आल्याने पोलिसांकडे वेळही खूप कमी होता.
काही दिवसांपूर्वी वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका परिसरात इसिस या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी फिरत असल्याची माहिती देणारा पालघर नियंत्रण कक्षाला फोन आला होता. ही वसई तालुक्यात दहशतवादी आल्याची माहिती देणारी दुसरी घटना आहे.
पालघर दहशतवादी विरोधी पथक (एटीएस), ठाणे दहशतवादी विरोधी पथक(एटीएस), पालघर स्थानिक गुन्हे शाखा या सर्वांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे देखील तुळींज पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाण मांडून बसले होते. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पाटील आणि पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांची पोलीस कर्मचारी घेऊन शोध मोहीम सुरू केली. मॅसेज मधील 1 फोटो आणि 5 जणांची नावे आलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आणि त्यांना आचोळे रोडवरील साईधाम टॉवरच्या परिसरातून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
तपासाअंती सोशल मीडियावर वायरल करण्यात आलेला मॅसेज खोटा असल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. या पाचही तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून तुळींज पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही. तसेच यांना मानसिक त्रास देण्यासाठी किंवा कोणीतरी मस्करी केली असल्याचे तसेच मॅसेज करण्यात आलेला मोबाईल नंबर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी लोकमतला बोलताना सांगितले आहे.