नाळवंडीतील रबरी शिक्का हजेरी प्रकरण: अडीच वर्षांपासून पडलेली फाईल पुन्हा उघडली
By सोमनाथ खताळ | Published: September 21, 2022 06:04 PM2022-09-21T18:04:24+5:302022-09-21T18:04:52+5:30
'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच पोलीस, आरोग्य विभागाच्या कारवाईच्या हालचाली सुरू
सोमनाथ खताळ, बीड: रबरी शिक्का लावून हजेरी लावल्याचा प्रकार नाळवंडी आरोग्य केंद्रात घडला होता. ही फाईल अडीच वर्षांपासून दडपली होती. परंतू टाकरवण केंद्रातील प्रकारानंतर याला पुन्हा वाचा फुटली. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच पोलीस व आरोग्य विभागाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. फाईलवरील धुळ झटकून ती पुन्हा उघडली आहे. याच प्रकरणात सीईओंनी बीड शहर पोलिसांना पत्र पाठवून रबरी शिक्क्यांचा तपास लावण्याबाबत सांगितले होते. परंतु हे पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचले नसल्याचे बुधवारी समोर आले आहे. यावरून अधिकाऱ्यांनी हे पत्र दडपल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड तालुक्यातील नाळवंडी आरोग्य केंद्रात ४ फेब्रुवारी २०१९ रोजी डॉ.सोनाली सानप, डॉ.बबन जाधव, आरोग्य सहायक रामचंद्र बहीर यांनी शिपाई आत्माराम यादव यांच्यामार्फत रबरी शिक्के लावून हजेरी लावल्याचे समोर आले होते. माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संजय कदम व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांनी कायाकल्प अंतर्गत भेट दिल्यावर हा प्रकार चव्हाट्यावर आला होता. याचा अहवाल त्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. तत्कालीन सीईओ अमोल येडगे यांनी सुनावणी घेतली असता या सर्वांनी रबरी शिक्के लावून हजेरी लावल्याचे कबुल केले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सीईओंनी १६ मे रोजी २०१९ रोजी उपसंचालकांना पत्र दिले. सोबतच बीड शहर पोलिसांनाही पत्र पाठवून रबरी शिक्क्यांचा तपास लावण्यास सांगितले होते. परंतू येडगे यांची बदली झाली आणि हे प्रकरण थंड झाले. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करत हे पत्र केवळ आवक जावक ला नोंदवून घेत पुढे कोणालाच पाठविले नाही. त्यामुळे या डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कसलीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जसा पोलिसांचा अर्ज दडपला तसाच उपसंचालकांना पाठविलेला अर्जही दडपल्याची शक्यता आहे. त्यामुळेच आतापर्यंत कारवाई झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
डॉक्टरांसह पत्र दडपणारेही गोत्यात
अगोदरच रबरी शिक्के लावून हजेरी लावत आरोग्य विभागाची फसवणूक करण्यात आली. यातील दोषींवर ४२० कलमांतर्गंत फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर हे पत्र दडपून त्यांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यात सह आरोपी म्हणून सहभाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रबरी शिक्के लावणाऱ्यांसोबत आता पत्र दडपणारेही गोत्यात आले आहेत.
रबरी शिक्का संदर्भात जि.प.सीईओ अथवा आरोग्य विभाग यांचे पत्र आम्हाला मिळालेले नाही. आम्ही सर्व रेकॉर्ड तपासले आहे.
-रवि सानप, पोलीस निरीक्षक, शहर ठाणे बीड
--
या फाईलची माहिती घेतली आहे. उपसंचालकांना याबाबत पत्र पाठवून स्मरण करून दिले जाईल. तसेच पोलिसांनाही आगोदरच्या पत्राचा रेफरन्स टाकून आणखी पत्र पाठविले जाईल.
-डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
--
रबरी शिक्का प्रकरणातील कारवाईबाबत पत्र आले की नाही, याची तपासणी करण्यास सांगितले आहे. लवकरच आपणाला कळविले जाईल. असा प्रकार असेल तर गंभीर असून निश्चीतच कारवाई केली जाईल.
-डॉ. कमल चामले, उपसंचालक लातूर
---
दरम्यान, याबाबत नाळवंडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली सानप यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या बिझी होत्या. तर तेव्हाचे नाळवंडीचे आणि आताचे साक्षाळपिंपरी येथे कार्यरत असलेले डॉ.बबन जाधव म्हणाले, याबाबत तुम्हाला डीएचओ ऑफिसलाच माहिती मिळेल. मला काही आठवत नाही.