दोनशे जणांच्या नावे वाहन कर्ज लुबाडणाऱ्या टोळीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 09:24 PM2018-09-18T21:24:29+5:302018-09-18T21:24:56+5:30
मेसर्स फॉरचून इंटिग्रेटेड ॲसेट फायनान्स लिमिटेड ही कंपनी वाहन खरेदीस वित्त पुरवठा करते. या कंपनीकडून वाहन वित्त पुरवठा व्यवसाय करण्यासाठी रेव्हेन्यू शेरिंग पार्टनर्सची नेमले जातात.
मुंबई - वाहनासाठी कर्ज देणाऱ्या कंपनीकडून खोट्या कागदपत्रांवर दोनशे जणांच्या नावाने कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (इओडब्ल्यू) पथकाने अटक केली. तिरुमली अब्दुल रेहमान शमीर, मोहम्मद अब्दुल रेहमान शकीर, थोगाटा मोहन नागराजू अशी या तिघांची नावे असून दोघे कंपनीचेच कर्मचारी आहेत.
मेसर्स फॉरचून इंटिग्रेटेड ॲसेट फायनान्स लिमिटेड ही कंपनी वाहन खरेदीस वित्त पुरवठा करते. या कंपनीकडून वाहन वित्त पुरवठा व्यवसाय करण्यासाठी रेव्हेन्यू शेरिंग पार्टनर्सची नेमले जातात. २०१६ साली आंध्रप्रदेशच्या अनंतपूर ए स्टार ऑटो फायनान्स या एजन्सीला परवाना देण्यात आला. या एजन्सीने इतर कंपनीतील कर्जदारांच्या डेटा वापरून खोटी कागदपत्र तयार केली. २८७ जणांच्या नावे सुमारे सात कोटीचे कर्ज घेण्यात आले. कर्जाचे हफ्ते मात्र कंपनीकडे भरले जात नसल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी कागदपत्रे तयार करून ही कर्ज घेण्यात आल्याचे लक्षात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्य क पोलिस निरीक्षक सुनील करांडे यांच्या पथकाने अनंतपूरम आणि ओंगल या ठिकाणी छापे टाकून शमीर, शकिर आणि नागराजू या तिघांना अटक केली. या तिघांनी मिळालेल्या पैशातून अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे तपासातून उघड झाले आहे.