अमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 05:08 PM2018-08-21T17:08:37+5:302018-08-21T17:11:53+5:30
अमोल काळेच्या डायरीत सीबीआय अधिकारी नंदकुमार त्यांच्या नावापुढे राक्षस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सध्या या अधिकाऱ्यासह इतर व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
मुंबई - पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडाप्रकरणी पुण्यातून अटक आरोपी अमोल काळे याच्या डायरीतून निशाण्यावर असलेल्या व्यक्तींची नावे समोर आली आहे. सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांचेही नाव असण्याची शक्यता सीबीआयने वर्तवली आहे.
सापडलेल्या डायरीत रडारवर असलेल्या ६ व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली होती. यामध्ये ठाण्यातील ४ व्यक्तीचे नावे असून उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचे नाव असल्याचे अढळून आले. विशेषत: अमोल काळेच्या डायरीत नायर यांचा उल्लेख मुंबई एसपी म्हणून करण्यात आला होता. नंदकुमार नायर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येसंदर्भात वीरेंद्र तावडे या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या संस्थांकडून नंदकुमार नायर यांच्यावर टीका होत होती. सीबीआयच्या सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार नायर हे सनातन संस्थेशी संबंधीत लोकांची चौकशी करीत होते. काही जणांनी त्यांना धमकी दिली होती. अमोल काळेच्या डायरीत सीबीआय अधिकारी नंदकुमार त्यांच्या नावापुढे राक्षस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सध्या या अधिकाऱ्यासह इतर व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.