नांदेडचे पिस्तुल जालन्यात; गावठी पिस्तुल आणि काडतुसांसह दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 01:04 PM2019-12-12T13:04:38+5:302019-12-12T13:26:02+5:30
जप्त केलेले पिस्तुल एकाने नांदेड येथून घेऊन जालना येथील व्यक्तीला विक्री केली
जालना : अवैधरीत्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी सकाळी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका हॉटेलसमोर करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेले पिस्तुल एकाने नांदेड येथून घेऊन जालना येथील व्यक्तीला विक्री केली होती.
जालना येथील एका व्यक्तीकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून बुधवारी सकाळी पथकाने जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एका हॉटेलसमोरील कारमध्ये (क्र.एम.एच.२८- ए.झेड.१२८७) बसलेल्या मनोज मुकुंद वाळके (२६, रा. कन्हैय्या नगर, जालना) याची तपासणी केली. त्यावेळी मनोज याच्या कमरेला गावठी पिस्तुल, मॅक्झिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरील पिस्तुल हे अजितसिंग मलखसिंग कलाणी (२७ रा. चंदनझिरा) याच्याकडून विकत घेतल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी कारवाई करून कलाणी याला ताब्यात घेतले. कलाणी याने ते पिस्तुल नांदेड येथून विकत घेऊन वाळके याला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी पिस्तुलासह, दोन जिवंत काडतुसे व कार जप्त केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोहेकॉ. सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, पोना. गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, अंबादास साबळे, कृष्णा तंगे, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, विलास चेके, संदीप मांटे यांच्या पथकाने केली.
आजवर ७ पिस्तूल जप्त
चालू वर्षात जालना शहरासह परिसरातून तब्बल सात पिस्तुल जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने चार, दरोडा प्रतिबंधक पथकाने दोन व सदरबाजार पोलिसांनी एक पिस्तुल जप्त केली आहे. त्यामुळे पिस्तुल शहरात आणते कोण आणि कोठून याचा शोध घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.