Narayan Rane: ...तर नारायण राणेंना कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते; अटकेच्या सात तासांनंतर मिळाला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:59 AM2021-08-25T06:59:00+5:302021-08-25T06:59:45+5:30

Narayan Rane can be in Jail for maximum 7 years: मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरुद्धचे वादग्रस्त विधान भाेवले, महाड, पुणे, नाशिक येथे गुन्हे दाखल, शिवसेना-भाजपचा राज्यभरात राडा

Narayan Rane got Bail seven hours after his arrest from Mahad Court in Uddhav Thackeray Criticism | Narayan Rane: ...तर नारायण राणेंना कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते; अटकेच्या सात तासांनंतर मिळाला जामीन

Narayan Rane: ...तर नारायण राणेंना कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते; अटकेच्या सात तासांनंतर मिळाला जामीन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी/रायगड/मुंबई : अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर रात्री उशिरा पडदा पडला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जल्लोष केला. नाशिक आणि पुणे पोलिसांनीही राणे यांचा ताबा मागितला नाही. त्यामुळे राणेंना मोठा दिलासा मिळाला. (Narayan Rane Arrested, got bail after 7 hours.)

सोमवारी महाड येथे राणे यांनी ‘मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चढवली असती,’ असे विधान केले होते. या विधानाबद्दल महाड, पुणे आणि नाशिक येथे राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यानंतर राणे यांना अटक केली जाणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. राणे यांच्या अनुद्गाराचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी  राणे यांच्या पोस्टरला काळे फासणे, जोडे मारणे, पुतळा दहन यासारखी आंदोलने केली. भाजपची कार्यालये लक्ष्य करीत तोडफोड केली. 

महाड न्यायालयात नेमके काय झाले ?
राणे यांना पावणे दहा वाजण्याच्या सुमारास महाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ५५ मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद चालला.

राणेंचे वकील...
ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली आहे. लावलेली कलमे चुकीची आहेत. तपासाची कारणेदेखील चुकीची आहेत. राणेंना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी नोटीस दिली नाही. राणेंनी पत्रकार परिषदेत जाहीर वक्तव्य केल्याने त्यामागे कोणतेही कटकारस्थान नाही. राणे यांना वैद्यकीय कारणांनी जामीन द्यावा, असा युक्तिवाद राणे यांच्या वकिलांनी केला.

सरकारी वकील...
राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते एक जबाबदार व्यक्ती आहेत. मग ते बेजबाबदारपणे कसे वागले, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. राणे यांनी केलेल्या वक्तव्यामागे कट आहे. त्यामुळे त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

जामीन देताना अटी
भविष्यात असे न करण्याची हमी
पुरावे नष्ट करता येणार नाहीत 
दोन दिवस रायगड गुन्हे शाखेला भेट द्यावी लागेल
ऑडिओ सँपल द्यावे लागेल

कमाल सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद
नाशिकमध्ये फिर्यादी सुधाकर भिका बडगुजर यांच्या तक्रारीवरून राणे यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५००, ५०५(२), १५३-ब (१) (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  महाड व पुण्यातही अशा प्रकारची कलमे लावण्यात आली आहेत. या कलमांनुसार, कमाल सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

गोळवली येथे घेतले होते ताब्यात
राणे सोमवारी रात्रीच चिपळूणमध्ये दाखल झाले. तोपर्यंत त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणच्या दिशेने निघाल्याचे वृत्त आले होते. चिपळूणमधील कार्यक्रम आटोपून ते रत्नागिरीकडे निघाले. गोळवली येथे स्व. गोळवलकर गुरुजींच्या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. तेथेच पोलीस फौजफाटा दाखल झाला. तेथेच त्यांना अटक करण्यात आली.

सत्र न्यायालय, उच्च न्यायालयात दिलासा नाही
रत्नागिरी जिल्हा कोर्टात राणे यांच्या वतीने ट्रान्झिट जामिनासाठी अर्ज देण्यात आला होता. मात्र, जिल्हा कोर्टाने तो फेटाळला. त्याचवेळी राणे यांनी तीन ठिकाणी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी व अटकेपासून संरक्षण देण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली.
ॲड. अनिकेत निकम यांची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने फेटाळली. त्यासाठी अर्ज करण्याची कायदेशीर प्रक्रिया आधी करा, असे बजावत आम्हाला रजिस्ट्रीचे काम करायला लावू नका, असेही कोर्टाने वकिलांना सुनावले.

Web Title: Narayan Rane got Bail seven hours after his arrest from Mahad Court in Uddhav Thackeray Criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.