नरेंद्र मेहतांचा केक वरिष्ठ पोलीस निरीक्षकास भोवण्याची शक्यता; पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 08:23 PM2022-09-22T20:23:45+5:302022-09-22T20:24:14+5:30
भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात साजरा करण्यात आला होता . माजी आमदार नरेंद्र मेहता देखील त्यांच्या समर्थकांसह देसाई यांच्या दालनात पोहचले .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भ्रष्टाचार, बलात्कार सह विविध गुन्ह्यात आरोपी असलेले भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या हस्ते पोलीस ठाण्यातच वाढदिवसाचा केक कापून खाणे आणि वाढदिवस साजरा करणे भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांना भोवण्याची शक्यता आहे . आम आदमी पार्टी सह अन्य काही पीडित नागरिकांनी या प्रकरणी तक्रारी केल्या नंतर पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत .
भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात साजरा करण्यात आला होता . माजी आमदार नरेंद्र मेहता देखील त्यांच्या समर्थकांसह देसाई यांच्या दालनात पोहचले . तेथे केक कापण्यात आला व मेहतांनी देसाई यांना केक भरवला , बुके दिला त्याची छायाचित्रे मेहता समर्थकांनी समाज माध्यमांवर शेअर केली होती .
सदर बाब लक्षात येताच आम आदमी पार्टी सह मेहतां विरोधातील फिर्यादी जय शुक्ला यांनी पोलीस ठाण्यातील आरोपी व पोलीस अधिकारी यांच्या ह्या बर्थडे पार्टी ची तक्रार पोलीस आयुक्तां पासून शासन स्तरावर केली आहे . मेहता व त्यांच्या पत्नी सुमन यांच्यावर काही महिन्यां पूर्वीच नवघर पोलीस ठाण्यात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . त्या गुन्ह्यात मेहता हे पोलिसांना सापडले नव्हते . या शिवाय मेहतां विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात अन्य तक्रारी प्रलंबित असून काही गुन्हे दाखल आहेत . मेहतांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात बलात्कार , फसवणूक पासून विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत .
मेहतांना अटक न करता पळायची संधी देणे , त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात काटेकोर तपास व पुरावे सादर न करता त्यांना मदत करणे , तक्रारी असून देखील कारवाई न करणे, मेहतांच्या विरोधकांवर मात्र खोटी कारवाई करणे असले प्रकार शहरातील नागरिक व तक्रारदारांना अनुभवयाला मिळाले आहेत असा आरोप तक्रारदारांनी केला आहे .
पोलिसांच्या दप्तरी अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि अनेक तक्रारी प्रलंबित असताना देसाई सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने पोलीस ठाण्यातच मेहतां सोबत केलेले बर्थडे सेलिब्रेशन हे मेहता व पोलिसांचे घनिष्ट लागेबांधे असल्याचे स्पष्ट करते. पोलिसांची प्रतिमा डागाळली जात असून पोलीस ठाण्यात असे आरोपीं वाढदिवस साजरे करणे गंबीर आहे असे आरोप शुक्ला सह आम आदमी पार्टीचे ब्रिजेश शर्मा , सुखदेव बिनबंसी, राजेश शर्मा आदींनी केला आहे . पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त अमित काळे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .