कंटेनर, टेम्पो चोरीच्या गुन्ह्याचा नारपोली पोलिसांनी ४८ तासात लावला छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 05:37 PM2021-08-13T17:37:39+5:302021-08-13T17:38:29+5:30
Narpoli police cracked down Robbery : पाच आरोपींसह ८५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
नितिन पंडीत
भिवंडीतील नारपोली पोलीस ठाणे क्षेत्रातील दापोडा व पुर्णा येथून माल भरलेले कंटेनर व टेम्पो चोरी प्रकरणी पोलिसांनी अवघ्या ४८ तासात या दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावून या मधील पाच आरोपीं सह चोरीस गेलेला ८५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे .
पहिल्या घटनेत दापोडा येथील श्रीराम कंपाऊंड येथे गोदमातून कंटेनर मध्ये यॉर्क एक्स्पोर्ट, एस एस सोल्युशन,कनवर कॅनव्हस ,रिव्हाल्युशन ब्युटीया या कंपनीचे टी शर्ट, स्वेटर, स्त्रियांचे कपडे व सौंदर्य प्रसाधने साहित्य भरून ठेवलेला असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या मदतीने ७६ लाख रुपये किमतीचा माल व ५ लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता.
तर दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा गावाच्या हद्दीत चॉकलेट चा १ लाख १० हजार रुपये किमतीचा चॉकलेट व खाद्य सामुग्रीचा माल भरून ठेवलेला टेम्पो उभा करून ठेवला असता रात्रीच्या अंधारात तो अज्ञात चोरट्यांनी पळविल्याच्या घटना दोन दिवसात घडल्याने खळबळ उडाली असतानाच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील पोलीस उप निरीक्षक राहुल व्हरकटे, पो हवा सोनवणे, सातपुते,नवले,जाधव,पाटील,सोनगिरे, बंडगर, माने,ताटे या पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणच्या परिसरातील मोबाईल टॉवर वरून त्या परिसरात त्या वेळी कार्यरत मोबाईलचा तांत्रिक तपास करीत पहिल्या गुन्ह्यात राजकुमार रामचंद्र पाल ,शिवानंद अनिल पवार ,विनायक मोहन जगताप तिघे व्यवसायाने चालक असणाऱ्या आरोपींना अटक केली तर दुसऱ्या गुन्ह्यात इम्तियाज लियाकतअली अन्सारी उर्फ पंजाबी व आजीदूर रहेमान मोहम्मद हरून अन्सारी हे टेम्पो घेऊन मालेगाव येथे पळून गेल्याची माहिती काढून पोलिसांनी सापळा रचून या दोन आरोपींना मालेगाव येथून ताब्यात घेतले आहे . या पाच ही आरोपीं कडून चोरीस गेलेले कंटेनर ,टेम्पो व सर्व ८५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे .